ठाणे -उत्तर प्रदेशमधील हाथरसच्या पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी नवी मुंबईमध्ये काँग्रेसने आंदोलन केले. काँग्रेसने जुईनगर येथील चिंचोली तलावात उतरुन हे सत्याग्रह आंदोलन केले. नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
हाथरस प्रकरण: काँग्रेसचे चिंचोली तलावात उतरून आंदोलन - नवी मुंबई काँग्रेस लेटेस्ट आंदोलन
उत्तर प्रदेशातील हाथरस सामुहिक अत्याचार प्रकरणामुळे देशभरात संताप व्यक्त होत आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. नवी मुंबईत काँग्रेसच्यावतीने हाथरस येथील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी निदर्शने करण्यात आली.

हाथरस प्रकरणानंतर संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. पीडितेच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह कुटुंबीयांशिवाय जाळण्यात आला. यामुळे उत्तर प्रदेश प्रशासनाचा क्रूर चेहरा समोर आला आहे. त्यांना पोलिसांचीही साथ आहे. उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी (कायदा व सुव्यवस्था) दावा केला की पीडितेवर अत्याचार झाला नाही. हे प्रकरण अत्यंत बेजबाबदारपणे आणि हुकुमशाही पद्धतीने हाताळण्यात येत आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
पीडित कुटुंबाला न्याय देण्याऐवजी त्यांना धमक्या देण्यापर्यंत उत्तर प्रदेश सरकारची मजल गेली आहे. त्यामुळे या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी व हाथरस घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करत असल्याचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी सांगितले. यावेळी मोदी व योगी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.