नवी मुंबई -सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणेसह आता नवी मुंबईतील शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे आज रविवारच्या सुट्टीनंतर उद्या पुन्हा एक सुट्टी मिळणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये मात्र आनंदाचे वातावरण दिसत आहे.
नवी मुंबईतील शाळा-महाविद्यालयांना उद्या ५ ऑगस्टला सुट्टी - student happy navi mumbai
सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाण्यासह आता नवी मुंबईतील शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
‘सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून, सुट्टी मिळेल काय?’ चिमुकल्यांच्या ओठावरले हे गाणे आज पावसाने खरे ठरवले. गेल्या ४ दिवसांपासून सुरू असलेल्या अस्मानी संकटामुळे नवी मुंबईची दाणादाण उडाली आहे. त्यातच हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नवी मुंबईतील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पावसाचा जोर आजच्या दिवशीही कायम राहिल्याने सीबीडी-बेलापूर, नेरूळ, सीवूडस, वाशी, ऐरोली येथील सखल भागांत पाणी साचले होते. सीबीडीतील सेक्टर ४ येथील बस डेपोला अक्षरशः तळ्याचे रूप आले होते. त्यामुळे प्रवाशांना गुडघाभर पाण्यातून ये-जा करावी लागत होती. एनएमएमटीच्या बसही यामुळे उशिराने धावत होत्या. ठाणे जिल्ह्यात मागील २ दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ५ ऑगस्ट म्हणजेच उद्या देखील अतिवृष्टीची शक्यता आहे.