ठाणे -नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, यासाठी शिवसेना ठाम असतांना दुसरीकडे विरोधक आणि स्थानिक भूमिपुत्र दिबा पाटील यांच नाव देण्यासाठी आक्रमक होतांना दिसत आहेत. त्यात आता स्थानिक युवक भूमिपुत्र हे देखील रस्तावर उतरत आहेत. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील पाच तरुणांची पंचमहाभूत नावाचा गृप तयार करून त्या गृपद्वारे नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबत खेडोपाडी जावून जनजागृती करत आहेत.
दिबा पाटील या नावाची मागणी करणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सर्वपक्ष कृती समितीची स्थापना केली. त्याच समितीशी सलग्न पंचमहाभूत चारही जिल्ह्यात लोकनेते दिबा पाटील यांच्या विषयी जनजागृती करीत आहेत. विमानतळाला नाव देण्याची मागणी 2012 पासूनची आहे. 2012 ला अखिल आगरी परिषदेच्या अधिवेशनात लोकनेते दिबा पाटील हयात असताना भूमिपुत्रांनी नवी मुंबई विमानतळाला त्यांचे नाव देण्याची तत्कालीन मुख्यमंत्र्याकडे मागणी केली होती. आता शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची तयारी सुरू केली आहे, त्यामुळे आता हा नावांचा वाद पेटला आहे.
2013 ला विमानतळाला जमिनी संपादनाच्या वाटाघाटातील विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांमध्ये विमानतळाला दिबांचे नाव देण्याची ही एक प्रमुख मागणी होती. 2015 ला हुतात्मादिन साजरा करते वेळी अखिल आगरी परिषदेचे अध्यक्ष श्याम म्हात्रे यांनी दिबांच्या नावासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार कपिल पाटील यांच्याकडे निवेदन दिले होते. त्यानुसार 2016 ला खासदार कपिल पाटील यांना मिळालेल्या निवेदनावरुन लोकसभेत प्रथमत: मागणी मांडली. त्यानंतर 2018 वरळी 28 मार्च अखिल आगरी सेवा संघ येथे अनेक भुमीपुत्र संघटनेचा मिळून भूमिपुत्र महासंघ झाला त्या महासंघाद्वारे क्राँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याकडे निवेदन 2018 ला अशोक चव्हाण यांनी तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर पुढे देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राशी पत्रव्यवहार केला असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
2018 नागरी उड्डान मंत्रालयाला श्याम म्हात्रे यांनी दिबांच्या नावाची मागणी करणारे पत्रक पाठवले. 2018-19 ला खासदार कपिल पाटील यांनी पुन्हा संसदेत हा प्रस्ताव मांडला. 2020 डिंसेबरमध्ये करोनाच्या सावटात जग असताना एकनाथ शिंदे नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, यासाठी मुख्यंमंत्र्याना निवेदन दिले. त्यावेळी तात्काळ अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशदथ पाटील यांनी लोकनेते दिबांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यासंदर्भात सभा बोलवली व 20 जानेवारी 2021 रोजी आगरी कोळी युथ फाऊंडेशचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी नवी मुंबईत याच संदर्भात रॅपीड बैठका 20 पेक्षा अधिक गावात घेतल्या. मात्र सिडकोने या विमानतळाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव करुन भूमीपुत्रांना भडकवले. त्यामुळे या विमानतळाला दिबांचेच नाव द्यावे या मागणीसाठी पंचमहाभूत गृपच्या वतीने जन जागृती करण्यात येत आहे.