ठाणे - भिवंडीपासून मुख्य शहराला जोडणाऱ्या कशेळी ते वडपे या रस्त्याचे बीओटी तत्वावर काम सुरू आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कशेळी खाडीवर तब्बल अडीचशे कोटी रुपये खर्चून दीड किलोमीटर लांबीचा पूल उभारला आहे. परंतु, हा पूल उभारताना संरक्षक उपाययोजनांची अंमलबजावणी न केल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. आरटीआय कार्यकर्ते किशोर जाधव यांनी संबंधित सत्य उजेडात आणले असून त्याविरोधात स्थानिक नागरिकांच्या मदतीने कशेळी पुलावर मूक निदर्शने करण्यात आली.
भिवंडी-ठाणे रस्त्याला जोडणाऱ्या कशेळी वडपे रस्त्यावर दोन स्वतंत्र मार्गिका असलेला पूल बांधण्यात आलाय. मात्र, हे करत असताना या पुलावरील संरक्षक कठड्याची उंची फक्त दोन ते अडीच फूट ठेवण्यात आली आहे. कोणाचाही तोल गेल्यास व्यक्ती थेट खाडीत पडू शकते. तसेच या पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचे प्रकार देखील कायम घडत असतात. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते किशोर जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे माहिती अधिकारात पूल निर्मिती वेळी कोणत्या संरक्षक उपाययोजना केल्या, यासंर्भात विचारणा केली. त्याबाबत कोणतीही काळजी घेतली नसल्याचे उघड झाले आहे.