ठाणे: इन्स्टाग्रामवरील पोस्ट लाईक व सबस्क्राईब केल्यास ऑनलाईन टास्कच्या नावाने ही फसवणूक केली गेली. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात अज्ञात गुन्हेगारावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी सायबर गुन्हे शाखेसह समांतर तपास सुरू केला. तक्रारदार मंदार जाधव (38 वर्षे) हे डोंबिवली पश्चिम भागात राहतात. ते नोकरीच्या शोधात असतानाच, त्यांना काही दिवसांपूर्वी त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी मोबाईल नंबर वरून मॅसेज आला. या मॅसेजमध्ये पार्टटाईम जॉबची ऑफर देण्यात आली होती.
आधी फायदा नंतर नुकसान:मॅसेजमध्ये दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामवरील पोस्ट लाईक आणि सबस्क्राईब केल्यास प्रतिदिन दोन ते पाच रुपये मिळतील, असे तक्रारदार मंदार यांना मॅसेजद्वारे सांगण्यात आले. त्यानंतर मंदार यांनी जॉब करण्याची तयारी दाखविल्याने सुरुवातीला टेलिग्रामवर एक ग्रुप बनवून मंदार यांना आर्थिक फायदा त्या अज्ञात सायबर गुन्हेगाराने मिळवून दिला. जॉब सुरू असताना मंदार यांना ऑनलाईन टास्क पूर्ण करण्यास सांगितले. या टास्कच्या नावाखाली विविध बँक खात्यावर एकूण 4 लाख 78 हजार रुपये भरण्यास भाग पाडून आर्थिक फसवणूक केली.
पोलिसात तक्रार दाखल:आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदार मंदार जाधव यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार डोंबिवलीत विष्णूनगर पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगारा विरोधात भादंवि कलम 66 (क) (ड) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक खंदारे करत आहेत.
ऑनलाईन प्रलोभनापासून सावधान:हॅकर्स सर्वसामान्य व्यक्तींची फसवणूक करून व्यक्तीच्या बँक खात्यातून रक्कम पळवित असतात. मात्र, आपण काही नियमांचे पालन केल्यास यावर अंकुश बसू शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सोशल मीडियाद्वारे मैत्री करून नंतर गिफ्ट देण्याच्या बहाण्याने लाखोंची फसवणूकही केली जाते. अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाच्या आमिषाने त्यांची फसवणूक करण्याचेही प्रकार घडतात. अशा प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा:
- SBI Fraud Case : एसबीआयची २८० कोटी रुपयांची फसवणूक, विकासक हरेश मेहताला सीबीआयकडून अटक
- Robbery At Jewelery Shop: भरदिवसा रिलायन्स ज्वेलरी शॉपमधून लुटले 14 कोटींचे दागिने, सीसीटीव्ही आला समोर
- Dowry Crime : हुंड्याच्या गुन्ह्यात उच्चशिक्षितांचा सहभाग सर्वाधिक; 4 महिन्यांत 218 गुन्हे