धक्कादायक ! दुचाकीची नंबर प्लेट तोडल्याच्या संशयातून तरुणाची हत्या; आरोपी गजाआड
घटनेच्या वेळी रस्त्यावर सीसीटीव्ही फुटेज नसल्याने सुरवातीला अज्ञात दुचाकीस्वार आरोपीला शोध घेण्यास पोलीस पथकाला तपासात आरोपीचा सुगावा लागत नव्हता. त्यामुळे सहा. पोलीस आयुक्त एम. डी. राठोड व उल्हासनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून आरोपीचा शोध घेण्यासाठी तीन पोलीस पथके तयार केली. त्यानंतर या पोलीस पथकांनी गोपनिय माहिती प्राप्त करून अनोळखी आरोपीचा शोध घेवुन त्याचे नाव निष्पन्न केले. त्यानंतर आरोपी करण राजकुमार जसुजा याला उल्हासनगरमधून अटक केली.
ठाणे - एका टेम्पोने दुचाकीला धडक देऊन नंबर प्लेट तोडल्याच्या संशयातून दुचाकीस्वाराने टेम्पोमध्ये बसलेल्या तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. हि घटना उल्हासनगर कॅम्प नंबर १ परिसरातील २४ नंबर शाळेसमोर घडली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल दुचाकीस्वाराला पोलिसांनी अटक केली आहे. करण राजकुमार जसुजा (वय २९ , रा . भिमनगर, उल्हासनगर ) असे हत्येप्रकरणी अटक आरोपीचे नाव आहे. तर भरत उर्फ सोनु सुरेश पाटडीया ( वय २२ ) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
कुठे तोडली नंबर प्लेट दाखव , याच रागातून हत्या -मृत भरत उर्फ सोनू हा उल्हासनगर कॅम्प नंबर १ भागात कुटंबासह राहून तो भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होता. त्यातच त्याचा मित्र आकाश राजु संचेरीया याच्या टेम्पोमधुन मृत भरत उर्फ सोनू सोमवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास २४ नंबर शाळेसमोरील रस्त्याने जात होता. त्याच सुमाराला पाठीमागुन दुचाकीवरून आलेल्या आरोपीने टेम्पोच्या समोर दुचाकी आडवी उभी करून टेम्पो चालक आकाश संचेरीया यास शिवीगाळ करून ' तु माझे मोटारसायकलला ठोकर मारून नंबर प्लेट तोडली ' असे बोलुन मारहाण करीत होता. त्यावेळी मृत भरत उर्फ सोनु पाटडीया याने आरोपीला जाब विचारात ' कुठे तोडली नंबर प्लेट दाखव , आम्ही तुला कधी ठोकर मारली ' असे भरत उर्फ सोनू म्हणाला असता त्या गोष्टीचा राग येवुन आरोपीने भरत उर्फ सोनु याला टेम्पोतुन बाहेर खेचुन शिवीगाळ करून ठोशाबुक्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर जोरात रस्त्यावर ढकलुन दिल्याने खाली पाडून गंभीर जखमी केले. या घटनेत नंतर सोनूला गंभीर जखमी अवस्थेत त्याच्या मित्राने रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचानामा केला. तर याप्रकरणी आकाश राजु संचेरीया याच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२,३४१,३२३,५०४ आज (मंगळवारी) पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल केला.