ठाणे -गुन्हेगारी क्षेत्रात वर्चस्व तसेच आर्थिक वादातून कुख्यात गुंड मुनिया उर्फ जिग्नेश ठक्कर याची दोन शुटर्सनी गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण रेल्वे स्थानकासमोर असलेल्या नीलम गेस्ट हाऊसच्या गल्लीत शुक्रवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली. धर्मेश उर्फ नन्नु नितिन शहा, त्याचा ड्रायव्हर जयपाल उर्फ जापान आणि दोन अनोळखी साथीदार, अशी हल्लेखोरांची नावे आहेत. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी अधुशहमा शब्बीर अन्सारी (वय - 37, रा. मदारछल्ला, अन्सारी चौक, कल्याण) याच्या जबाबानुसार फरार चौघांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घटनेनंतर आरोपींच्या शोधासाठी पाच पोलीस पथके रवाना झाली आहेत.
अधुशहमा शब्बीर अन्सारी हा 2011 पासून जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. तर जिग्नेश याचे कल्याण येथे किड्स वर्ल्ड नावाचे कपड्याचे दुकान, भिवंडी येथे मेडिकल स्टोअर्स, तसेच पालघर जिल्ह्यातील वाडा येथे स्टोन क्रशरचा व्यवसाय आहे. तर धर्मेश उर्फ नन्नू शहा आणि जिग्नेश ठक्कर हे बालपणीचे मित्र आहेत. या दोघांमध्ये सध्या आर्थिक व्यवहार तसेच गुन्हेगारी वर्चस्वावरून वाद सुरू झाले. तीनच दिवसांपूर्वी गुरुवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास शंकरराव चौकात गँगस्टर धर्मेश उर्फ नन्नू शहाचा साथीदार चेतन पटेल आणि जिग्नेश ठक्कर उर्फ मुनिया यांच्यात हाणामारी झाली होती. शुक्रवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास जिग्नेश ठक्कर हा त्याच्या कार्यालयातून बाहेर पडला. या कार्यालयासमोरील सुयश प्लाझा बिल्डींगच्या कोपऱ्यावर असलेल्या जनरेटरसमोर फोनवर बोलत उभा असतानाच धर्मेश उर्फ नन्नु नितिन शहा आणि त्याचा ड्रायव्हर जयपाल उर्फ जापान असे दोघे जिग्नेश ठक्कर याच्याजवळ आले. ते आपापसांत काहीतरी बोलू लागले. इतक्यात धर्मेश शहा आणि त्याचा ड्रायव्हर जयपाल यांनी पिस्तुलमधून जिग्नेशवर चार ते पाच गोळ्या झाडल्या.