ठाणे - दारू दिली नाही म्हणून मित्राचा अमानुषपणे खून करून पसार झालेल्या दोन मारेकऱ्यांना अटक करण्यात कल्याण येथील बाजारपेठ पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे हत्या करून पसार झालेल्या या दोन्ही मारेकऱ्यांच्या अवघ्या 12 तासांत पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. सुनिल गणेश चौधरी (27, सद्या राह. रामवाडी, टिळकचौक, कल्याण-पश्चिम) आणि लुटो कटकुल महलहार (26) अशी अटक केलेल्या मारेकऱ्यांची नावे आहेत. हे दोघेही सद्या कल्याण पश्चिमेतील टिळक चौकात असलेल्या रामवाडीत राहतात. तर मूळचे झारखंड राज्यातील गोड्डा जिल्ह्यातल्या नरोतमपुर, बिस्वास कहानी गावचे रहिवासी आहेत. अजय झल्ले रावत (वय 24) असे हत्या झालेल्या मित्राचे नाव आहे, अशी माहिती डीसीपी विवेक पानसरे यांनी दिली आहे.
अजयचा उपचारादरम्यान मृत्यू -
शनिवारी 4 सप्टेंबर रोजी पहाटे 4 च्या सुमारास कल्याण पश्चिमेतील अहिल्याबाई चौकात दोन व्यक्तींनी कोणत्यातरी कारणावरून हत्याराने अजयवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या अजय रावत याला तात्काळ मुंबईतील सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा 12 सप्टेंबर रोजी दुपारी 2 च्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात कलम 302, 34 अनव्ये गुन्हा नोंद करण्यात आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोनि राजेंद्र अहिरे, सपोनि प्रमोद सानप, सपोनि घोलप यांच्यासह गिरीष पवार, बावीस्कर, बागुल यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवली, असे डीसीपी पानसरे यांनी सांगितले.