ठाणे- जिल्हा परिषदेच्या मुरबाड पाटबंधारे विभागातील भ्रष्टाचाराचा श्रमजीवी संघटनेने पर्दाफाश केला असून निकृष्ट बंधारे बांधणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर त्यांनी कारवाईची मागणी केली आहे. खळबळजनक बाब म्हणजे, कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेले बंधारे पावसाळ्यात वाहून गेल्याचे समोर आले आहे.
मुरबाड पंचायत समितीच्या पाटबंधारे विभागाने पावसाळ्यापूर्वी सुमारे साडेतीन ते ४ कोटी रुपये खर्च करून सिमेंट बंधारे बांधले आहेत. मात्र, हे सर्वच बंधारे सिमेंट काँक्रिट ऐवजी दगड गोट्याने बांधली आहे. त्यामुळे या बंधाऱ्यांना चारच महिन्यात गळती लागली आहे. विशेष म्हणजे, बंधाऱ्यांची निकृष्ट कामे सुरू असताना स्थानिक रहिवाशी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी अर्जाद्वारे ही बाब पाटबंधारे विभागाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, पाटबंधारे विभागाने याकडे दुर्लक्ष केले. याविरोधात श्रमजीवी संघटनेने आवाज उठवला असून संबंधित अभियंत्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.