ठाणे : मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यंदाच्या निवडणुकीत एका जागेसाठी संभाव्य भाजप - शिंदे गटाची युती तुटल्याने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आली होती. अनेक वर्षांची आपली सत्ता अबाधित राखण्यास पुन्हा एकदा शिंदे गटातील माजी आमदार गोटीराम पवार यांना मोठे यश आले आहे. या निवडणुकीत भाजपला अर्थात आमदार किसन कथोरे यांच्या समर्थक उमेदवारांना रोखण्यासाठी शिवसेना शिंदे गट व भाजपच्याच दुसऱ्या गटाने हातमिळवणी केल्याचे दिसून आले.
भाजपला केवळ तीन जागा:मुरबाड कृषी बाजार समितीत १७ जागांसाठी प्रत्यक्ष झालेल्या निवडणुकीत सेवा संस्थांच्या ११ जागेसह सर्वच मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार निवडून आले. तर ग्रामपंचायत मतदार संघामधील सुरेश बांगर, रमेश उघडा आणि अशोक मोरे हे फक्त ३ भाजपचे उमेदवार निवडून आल्याने, शिंदे गटातील पवारांनी पुन्हा एकदा आपली सहकार क्षेत्रातील पकड मजबूत असल्याचे दाखवून दिले आहे. दुसरीकडे भाजपच भाजपच्या पराभवाचे कारण असल्याची चर्चा भाजपच्या गोटात सुरु झाली आहे.
भिवंडीत महायुतीला १० जागा तर आघाडीची ८ जागेवर सरशी: भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीची महाविकास आघाडीचे सहकार पॅनल व भाजप युतीची परिवर्तन पॅनल अशी थेट काटे कि टक्कर झाल्याचे पाहवयास मिळाले आहे. एकूण १८ जागा पैकी १० जागा भाजप शिंदे गटाला मिळाल्या आहे. तर ८ जागा महाविकास आघाडीचे पटकावल्या आहेत. आज झालेल्या मतमोजणीत महाविकास आघाडीचे १० पैकी ७ उमेदवार निवडून आले आहेत. तर ग्रामपंचायत मतदार संघात महायुतीचे ३ उमेदवार विजयी झाले असून महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या एका ग्रामपंचायत सर्वसाधारण जागेचा निकाल मविआच्या दिशेने लागला. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीवर महायुतीची सत्ता स्थापन होऊनही 'गड आला, पण सिंह गेला' अशा प्रतिक्रिया महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधून उमटत होत्या.