ठाणे - मुंबई महानगर पालिकेच्या अखत्यारातील येवई (पांजरापोळ) येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या, पाइप लाइनच्या उघड्या चेंबरमध्ये पडून गस्तीवर असलेल्या सुरक्षा रक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शिवराम बुधाजी भोईर ( वय ५७ रा. मोहाचा पाडा पुंडास, ता. भिवंडी ) असे मृत्यू झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. या घटनेने पालिका वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
'ईटीव्ही भारत'ला मिळालेल्या माहितीनुसार, मृत शिवराम हे गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ मुंबई महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. शनिवारी रात्रपाळीत आपले कर्तव्य बजावत होते. पांजरापोळ येथून जवळच्या टेकडीवर असलेल्या पाण्याच्या पाइप लाइनची पाहणी करण्यासाठी ते गेले होते. या दरम्यान अंधारात त्यांचा पाय घसरुन ते उघड्या चेंबरमध्ये पडले. यात डोक्याला जबरी मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना त्यांचे सहकारी सुरक्षा रक्षक सचिन महाजन व संजय कारभल हे रविवारी दुपारी ३ वाजता ड्युटीवर आले असता उघडकीस आली. सचिन, संजय यांना शिवराम भोईर यांची दुचाकी पाण्याच्या टाकीजवळ दिसून आली. मात्र शिवराम दिसले नाही. म्हणून त्यांनी त्यांचा शोध घेतला असता, शिवराम हे पाइप लाइनच्या उघड्या चेंबरमध्ये मृत अवस्थेत आढळून आले. तेव्हा त्यांनी या घटनेची तत्काळ माहिती भिवंडी तालुका पोलिसांना दिली.