ठाणे :ऑनलाईन धर्मांतर प्रकरणी गाजियाबाद पोलिसांनी ठाणे न्यायालयात न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून कवीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपी बद्दो उर्फ शाहनवाज मकसुद खान (२३) याला गाजियाबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेले आहे. मुंब्रा कौसा परिसरात राहणाऱ्या शाहनवाज याचा परिवारही परागंदा झालेला आढळला. त्याच्या घराला टाळे असल्याचे समोर आलेले आहे. त्याचे कुटुंबीय पोलिसांच्या संपर्कात असून ते अज्ञात स्थळी असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारानंतर ठाणे पोलिसांसह आता गुप्तचर यंत्रणा देखील सतर्क झाल्या असून त्यादेखील मुंब्र्यात ठाण मांडून आहेत.
ऑनलाईन धर्मांतर केल्याचा गुन्हा -गाजियाबाद जिल्ह्याच्या कवीनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आरोपी शाहनवाज याच्यावर ऑनलाईन धर्मांतर केल्याचा गुन्हा आहे. मुंब्रा कौसा येथे शाहनवाज याला दोन भाऊ आणि आई असा चारजणांचा परिवार आहे. दुसरीकडे गाजियाबादच्या कवीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच शाहनवाज फरारी झाला होता. त्याने गाजियाबाद पोलीस मुंब्र्यात धडकले आणि शाहनवाज याने मुंबई गाठले. त्यानंतर मुंबईच्या वरळी येथून थेट रायगड जिल्ह्यातील अलिबाग गाठले. मात्र नातेवाईकांशी संपर्कात असलेल्या शाहनवाज याने मोबाईल सिम बदलले असले तरीही पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारावर शाहनवाज याचे लोकेशन शोधून काढले आणि अटक केली.
परिवार परागंदा -सोमवारी आरोपी शाहनवाज याला गाजियाबाद पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर शाहनवाज याच्या मुंब्र्यातील घरातील अन्य परिवार परागंदा झालेले आहेत. त्याच्या राहत्या घराला कुलूप असल्याचे समोर आले. ठाणे पोलिसांनी आरोपी शाहनवाज याला अटक केल्यानंतर त्याच्याकडील काही डिव्हाईस आणि अन्य तांत्रिक बाबी हस्तगत केल्या. त्याही तपासासाठी युपी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्या.