मीरा भाईंदर (ठाणे) -उत्तरप्रदेश मधील हाथरसमध्ये युवतीवर झालेल्या अत्याचारा विरोधात देशभरातून योगी सरकारवर टीका होत आहे. याप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करावा आणि याप्रकरणाचा तपासही मुंबई पोलिसांनी करावा, अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली. सरनाईक यांनी शुक्रवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ट्विटरवर टॅग करत ही मागणी केली.
उत्तरप्रदेशमधील युवतीवर झालेल्या अत्याचारा विरोधात देशात राजकारण तापू लागले आहे. गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तरप्रदेश पोलिसांनी दिलेल्या वागणूकीबाबत संपूर्ण देशभर काँग्रेसमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. यामध्ये आता शिवसेनेनेसुद्धा उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे.
उत्तरप्रदेशमध्ये अत्याचार झालेल्या युवतीच्या प्रकरणाचा तपास ज्याप्रकारे उत्तरप्रदेश पोलीस करत आहेत, तो संशयास्पद आहे. त्यामुळेच आज मी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ट्विट केले आहे, असे सरनाईक म्हणाले. हाथरस प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच मुंबई पोलिसांनी त्याचा तपास उत्तरप्रदेशमध्ये जाऊन करावा. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी बिहार पोलीसांनी मुंबईत येऊन तपास केला. याप्रमाणे मुंबई पोलिसांनीदेखील उत्तरप्रदेशमध्ये जावे, अशी मागणीही त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली.