नवी मुंबई - कळवा ते ऐरोली एलिव्हेटेड मार्गासाठी साडेचार हजार चौ.मी. जमीन मध्य रेल्वेला हस्तांतरित करण्याचा निर्णय सिडकोच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली व पुढील लोकल प्रवासासाठी नवी मुंबईतून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. यामुळे ठाणे रेल्वेस्थानकाचा भार देखील कमी होणार आहे. या प्रकल्पातील अडथळा दूर झाला असून, हस्तांतरणाची प्रक्रिया सिडको व रेल्वे या दोन्ही प्राधिकरणांच्या माध्यमातून लवकरच सुरू केली जाणार आहे.
कल्याण-डोंबिवली व त्यापुढील लोकल रेल्वे स्थानकांवरून नवी मुंबईत येणाऱ्या व नवी मुंबईतून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना ठाणे रेल्वे स्थानकात गाडी बदलावी लागत होती. मात्र आता कळवा-ऐरोली हा एलिव्हेटेड रेल्वे मार्ग तयार करण्यात येणार आहे. यासाठी खासदार राजन विचारे यांनी सिडको आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक नवी मुंबईत घेतली.