ठाणेMP Dr Shrikant Shinde:भारतातील फुटबॉल खेळाचे नियमन करणाऱ्या नामांकित 'ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन'शी संलग्न असलेल्या 'द वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या' (WIFA) कार्यकारी समितीच्या बैठकीत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आणि कार्यकारी समितीच्या उपस्थितीत शनिवारी झालेल्या बैठकीत ही निवड झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.
'हे' आहे संस्थेचे महत्त्व:'द वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन' ही संस्था भारतात फुटबॉल खेळाचे नियमन करणाऱ्या नामांकित 'ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन'शी संलग्न आहे. तर, महाराष्ट्रात फुटबॉलचे नियमनही या संस्थेमार्फत करण्यात आले आहे. महाराष्ट्रात आणि देशात फुटबॉल खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि खेळासाठी आवश्यक गोष्टींची उभारणी करण्यासाठी काम करणारी ही सर्वांत जुनी संस्था १९११ पासून कार्यरत आहे. देशातील सर्वांत जुनी दुसरी स्पर्धा असलेल्या 'रोव्हर्स कप'ची सुरुवात संस्थेच्या स्थापनेपूर्वीच झाली होती. राज्यातील फुटबॉल खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेमार्फत विविध ठिकाणी स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धांच्या माध्यमातून अनेक गुणवंत खेळाडूंना अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली आहे.