ठाणे- उल्हासनगर महापालिका वगळता जिल्ह्यात सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेला उल्हासनगर महापालिकेचे महापौरपद मिळल्याने लोकशाहीत काही होऊ शकते, असे सूचक वक्तव्य कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महापौर निवडून आल्यानंतर प्रसारमाध्यांशी बोलताना केले.
लोकशाहीत काहीही होऊ शकते - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेला उल्हासनगर महापालिकेचे महापौरपद मिळल्याने लोकशाहीत काहीही होऊ शकते, असे सूचक वक्तव्य कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महापौर निवडून आल्यानंतर प्रसारमाध्यांशी बोलताना केले.
राज्यात नव्या सत्ता समीरकरणाचे वारे वाहत असतानाच त्याची प्रचती उल्हासनगर महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत पाहायला मिळाली. सत्ता स्थापनेसाठी ४० नगरसेवकांची मॅजिक फिगर लागते. त्यामध्ये भाजपचे सर्वाधिक ३२ नगरसेवक, शिवसेना, २५, राष्ट्रवादी ४, रिपाई ३, काँग्रेस, भारिप , पीआरपी प्रत्येकी १ असे पक्ष बलाबल आहेत. या पक्षीय बलाबल पाहता, शिवसेनेने भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपाई, आणि टीम ओमी कलानीच्या नगरसेवकांना सोबत घेऊन पालिकेवर भगवा फडकवून शिवसेनेच्या लिलाबाई अशान यांना ४३ मते मिळून महापौरपदी निवडून आणले.
दरम्यान, राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष माजी खासदार परांजपे यांनीही राज्याप्रमाणे जिल्ह्यातही सत्ता मिळवण्यासाठी माजी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे माजी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विनंतीला मान देऊन शिवसेनेला उल्हासनगरात पाठिंबा दिला आहे. तर, ठाणे महापालिकेतही आम्ही सोबत असून मात्र ठाणे महापालिकेचे विरोधीपक्ष नेते पद सोडणार नसल्याचेही सांगितले.