ठाणे- रॅपलिंग करताना हरिश्चंद्रगडावरील कोकण कड्यावरून पडून प्रसिद्ध गिर्यारोहक अरूण सावंत (वय - 60) यांचा मृत्यू झाला आहे. अरूण सावंत यांच्यासह एकूण 30 जण हरिश्चंद्रगडावर रॅपलिंगसाठी आले होते. मृत सावंत हे शनिवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाले होते. तेव्हापासून त्यांचा शोध सुरू होता. आज (रविवारी) त्यांचा मृतदेह बचाव पथकाला सापडला.
हेही वाचा - ठाण्यात 'फ्लेमिंगो'चे आगमन... पक्षीप्रेमी आनंदीत
गोरेगावमधील नामवंत गिर्यारोहक, सह्याद्रीची घोरपड म्हणून ओळखले जाणारे अरुण सावंत शनिवारी हरिश्चंद्रगडावरील मोहिमेत सहभागी झाले होते. सावंत हे मोहिमेचे प्रमुख होते. रोप फिक्सिंग करताना अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांचा मृतदेह सापडला असून, दरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा - दार अडवणाऱ्या टवाळखोर प्रवाशांमुळे लोकलमधून पडून तरुण गंभीर जखमी
सावंत शनिवारी संध्याकाळपासून बेपत्ता झाले होते. रॅपलिंगचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण होत आला होता. इतर 29 जण हे टप्पा उतरूनही आले होते. सावंत हे दोराच्या सहाय्याने रॅपलिंग करत असताना, बेपत्ता झाले. तेव्हापासून त्यांच्याशी संपर्क झाला नव्हता. स्थानिक आणि इतर ट्रेकर्सच्या मदतीने शोध घेण्यात येत होता. आज अखेर त्यांचा मृतदेह सापडला. तो बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी टोकावडे पोलीस, वालिव्हरे येथील ग्रामस्थ रघुनाथ खाकर सर, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.