ठाणे - दुचाकी चालवत असताना चालक मोबाईलवर बोलत असल्याने वाहतूक पोलिसाने थांबण्याचा इशारा दिला. मात्र, त्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्याला अडवून वाहन परवाना मागितला. मात्र, संतापलेल्या दुचाकी चालकाने हुज्जत घालून पोलिसाच्या कानशिलात लगावली. ही घटना भिवंडीतील सहायक पोलीस आयुक्त कार्यालयासमोर घडली.
वाहतूक पोलिसावर हात उचलणाऱ्या मुजोर वाहन चालकाला अटक
वाहतूक पोलिसावर हात उचलणे, मुजोर वाहन चालकाला चांगलेच महागात पडले आहे. पोलिसाशी हुज्जत घालून शिवीगाळ-मारहाण करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक
नितीन सोळाराम राठोड (वय 37) असे मारहाण झालेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. तर सचिन दादाराम वाघमारे( वय 37 रा. भंडारी कंपाउंड, नारपोली) असे मारहाण प्रकरणी अटक केलेल्या मुजोर वाहन चालकाचे नाव आहे.
सचिन दुचाकीवरून शनिवारी दुपारच्या सुमाराला कल्याण नाका येथून पुढे जात असताना तो धावत्या दुचाकीवरून मोबाईलवर बोलत होता. त्यामुळे थांबण्याचा इशारा वाहतूक पोलिसांनी केला. मात्र, तो न थांबता पुढे जाऊ लागल्याने वाहतूक पोलीस नितीन यांनी त्याचा पाठलाग करून अडवले व त्याच्याकडे वाहन परवाण्याची मागणी केली. त्यामुळे संतापून चालकाने परवाना देण्यास नकार देऊन राठोड यांच्या शर्टाची कॉलर पकडून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून त्यांच्या कानशिलात लगावली.
या घटनेप्रकरणी दुचाकीचालक सचिन याच्याविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पवार करीत आहेत.