ठाणे- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात जातानाही रुग्णांना पायीपाट करावी लागत आहे. अशीच एक माउली आपल्या २ वर्षाच्या चिमूरड्याला उपचारासाठी रुग्णालयात पायी घेऊन जात असताना बदलापूर शहरातील चेकपोस्टवरील तैनात असलेल्या पोलिसांच्या माणुसकीचे दर्शन घडले. या चिमुरड्याची नाजूक परिस्थिती पाहून या पोलिसांनी वेळीच त्या चिमुरड्याला उपचारासाठी दाखल केले. त्यामुळे या चिमुरड्याचे प्राण वाचल्याने त्या माऊलीने पोलिसांचे आभार मानले आहेत.
खाकीतील माणूसकी; माता गंभीर लेकाला पायी नेत होती रुग्णालयात, पोलिसांमुळे वाचला चिमुकल्याचा जीव
कोरोनाचा संसर्गाचा अनेकांना फटका बसला आहे. बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांनी संचारबंदीच्या काळात अनेकांना मदतही केली आहे. बदलापुरातही पोलिसांच्या खाकीतील माणुसकीचे दर्शन नागरिकांना झाले आहे. पोलिसांनी केलेल्या मदतीमुळे एका चिमुकल्याचा जीव वाचला आहे.
उपनिरीक्षक गावीत यांनी त्वरीत कर्तव्यावर तैनात असलेल्या महिला पुनम निदान, व बीट मार्शल नवाळी, उकीरडे यांना त्या महिलेला तिच्या लहान मुलासोबत रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. पोलिसांनी तात्काळ त्या महिलेसह चिमुकल्याला पोलीस वाहनामधून शिरगावातील स्वानंद रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांना सर्व हकिकत सांगितली असता डॉक्टरांनी देखील कोणतीही फी न घेताच चिमुकल्यावर प्राथमिक उपचार केले. थोडं बरं वाटल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले.
या चिमूरड्याची प्रकृती आता बरी असून त्याला फिट सारखा प्रकार आहे. तसेच अंगात तापही होता. परंतु तो आता स्वस्थ आहे. त्या महिलेला बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक देशमुख यांनी आर्थिक मदत करुन काळजी घेण्याची समज दिली. याशिवाय पोलिसांनी वेळीच मदतीचा हात दिल्याने त्या महिलेने पोलिसांचे आभार मानले आहेत.