ठाणे -कोरोनाच्या या महासंकटातही अनेक ठिकाणी माणुसकीचे दर्शन होताना दिसत आहे. एका महिन्याआधी येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर तिच्या नवजात बाळाच्या संगोपनाचा प्रश्न समोर आला होता. मात्र, समीक्षा मार्कंडे यांनी त्या नवजात बालकाचा आईप्रमाणे सांभाळ केला. एक महिन्यानंतर त्या बाधित महिलेने कोरोनावर मात केली. यानंतर त्या बाळाला परत न्यायला आले असता हे बाळ सोपवताना समीक्षा यांना शोक अनावर झाला.
येथील एका 9 महिन्याच्या गर्भवती महिलेला 14 जून रोजी कन्यारत्न प्राप्त झाले होते. मात्र, यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या नवजात कन्येच्या वडिलांनाही क्वारंटाईन करण्यात आले. यानंतर या नवजात कन्येच्या जबाबदारीचा प्रश्न निर्माण झाला. या परिस्थितीत मनसेने केलेल्या आवाहनानंतर महिला मनसेच्या उपशहर अध्यक्षा समीक्षा मार्कंडे यांनी या कन्येच्या संगोपनाची जबाबदारी घेतली आणि महिनाभर ही जबाबदारी पार पाडली.