ठाणे -मागील आठ महिन्यांपासून त्याच्या शोधात असलेल्या कुख्यात 'हड्डी'चा फिल्मी स्टाईलने थरारक पाठलाग करून बाजारपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इस्माईल मजीद उर्फ पापा हड्डी (वय 40 वर्षे), असे कुख्यात गुन्हेगाराचे नाव आहे.
तीस फूट टेरिसवरून लगतच्या पत्र्याच्या घरांच्या उडी -रामनवमीच्या रात्री बाजारपेठ पोलिसांनी कुख्यात गुन्हेगार इस्माईल मजीद उर्फ पापा हड्डी कल्याण पश्चिम भागातील मच्छीबाजार येथील मजीद हाऊस येथे त्यांच्या घरी आला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अरूण घोलप यांना मिळाली. या माहितीच्या आधारे घोलप यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांना माहिती दिल्यानंतर तपास पथकाला सतर्क केले. त्यानंतर महिला पोलीस खेमनार आणि इतर कर्मचाऱ्यांसह त्याच्या घराला वेढा घातला. त्यावेळी पोलीस आपल्या मागावर असल्याचे कळताच गुन्हेगार इस्माईल मजीद याने घराच्या टेरिसवरून लगतच्या पत्र्याच्या घरांच्या 30 फूट खाली जमिनीवर उडी मारल्याने त्यांच्या हाताला आणि पायालाही दुखापत झाली आहे. असे असतानाही पळून जाण्याच्या विचारात त्याने रस्त्यावर उडी मारली. त्यावेळी पोलीस कर्मचारी सचिन साळवी तेथे आधीच उपस्थित असल्याचे पाहून त्याने दुचाकी पोलिसाच्या अंगावर टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला.