ठाणे - भिवंडी शहरासह ग्रामीण परिसरामध्ये दुचाकीवरून धूम स्टाईलने नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्या टोळीला भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्हे शाखेच्या पथकाला आतापर्यत ९ गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश आले आहे. समद मोहम्मद अय्युब मोमीन, साबीर रहमान अन्सारी, शाहबाज अहमद अन्सारी असे अटक करण्याात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून सात महागड्या मोबाईलसह तीन दुचाकी, असा एकूण 1 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विविध ठिकाणी केलेल्या गुन्ह्याची दिली कबुली -
दुचाकी व चारचाकी वाहन चोरीसह नागरिकांचे मोबईल चोरीच्या घटनामध्ये मोठया प्रमाणात वाढ आहेत. त्यामुळे या गुन्ह्यातील तपास भिवंडी गुन्हे शाखेकडून सुरू असताना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दोन संशयितांना भिवंडीतून ताब्यात घेतले. त्यांनतर त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी विविध ठिकाणी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. गुन्हे शाखेच्या पथकाने या टोळीकडून सात महागडे मोबाईल व तीन दुचाकी वाहन असा एकूण 1 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी समद मोमीन, साबीर अन्सारी हे दोघे नागरिकांचे मोबाईल खेचून पळायचे, तर शाहबाज अहमद अन्सारी हा आरोपी चोरीचे मोबाईल व वाहन विक्रीसाठी मदत करीत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता-
या टोळीकडून भिवंडी पोलीस परिमंडळ हद्दीतील 4, तालुका व पडघा या ग्रामीण पोलीस ठाण्यातील 2 अशा एकूण 9 गुन्ह्याचा उलगडा केल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली असून या आरोपींकडून आणखीही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांचा शिवसेना प्रवेश आज नव्हे तर उद्या