ठाणे- राज ठाकरे यांच्या ईडीच्या चौकशीआधी ठाण्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. प्रवीण चौगुले नावाच्या एका तरुणाने स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रात्री उशीरा ठाण्यात घडला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवली यामुळे आपण आत्महत्या करत आहोत, असं सांगून प्रविणने आत्महत्या केली असल्याचे त्याच्या मित्रांचे म्हणणे आहे.
मनसे कार्यकर्त्याची जाळून घेऊन आत्महत्या २ दिवसांपूर्वी राज ठाकरे यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना चौकशीला सामोरं जावं लागणार यामुळे आपण दुःखावलो असून आत्महत्या करतोय, असे वारंवार प्रविण त्याच्या मित्रांना सांगायचा. एवढच नाही तर काल (मंगळवारी) दिवसभरात प्रविणने राज ठाकरे यांच्या समर्थनात आणि ईडी विरोधात अपशद्ध वापरुन शंभर पेक्षा जास्त फेसबुक पोस्ट केल्या आहेत.
प्रविण ठाण्यातील कट्टर मनसैनिक होता. मनसेचा कोणताही कार्यक्रम असो की मोर्चा आंदोलन प्रविण पुढे असायाचा. प्रत्येक मोर्चात प्रविण शरीरावर मनसेचा झेंडा रंगवून यायचा आणि त्यामुळे प्रविण सर्व नेत्यांचा चाहता बनला होता. मनसेच्या सर्व नेत्यांसोबत प्रविणचे फोटो आहेत. प्रविणच्या या आत्महत्येमुळे फक्त मनसैनिकांनाच नाही तर विविध पक्षातील कार्यकर्त्यांनाही धक्का बसलाय.
प्रवीण हा अनाथ असून तो एकटा राहायचा. पक्षाच्या प्रत्येक कामात तो स्वत:ला झोकून देऊन काम करायचा, असे प्रविणचे मित्र चंद्रकांत घाग, सागर फालेकर यांनी सांगितले. ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी राज ठाकरे यांना दु:ख होईल असे काहीही न करण्याचे आवाहन मनसैनिकांना यावेळी केले आहे. राज ठाकरेंनी काहीही चुकीचे केले नाही. त्यामुळे ईडी काहीही करु शकणार नाही. हे केवळ राजकारण आहे, असे ते म्हणाले आहेत.