ठाणे - लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपची पोलखोल करणाऱ्या सभा घेतल्यानंतर मनसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. त्यानंतर मनसेने आता विधासभेची तयारी सुरू केल्याचे चित्र दिसत आहे. येत्या १७ मे ला मनसेच्या वतीने ठाण्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चात राज्याभरातील शेतकऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच या मोर्चात आठ ते दहा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची कुटुंबही सहभागी होणार आहेत, अशी माहिती मनसेचे ठाणे जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत दिली आहे .
गेल्या आठवड्यात ठाण्यात आंबे विक्रीचा स्टॉल लावल्यावरून भाजप आणि मनसेत राजकीय राडा झाला होता. या राड्यानंतर आता मनसे आक्रमक झाली आहे. त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर आंदोलन छेडले आहे. याचाच भाग म्हणून १७ मे ला दुपारी एका मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात नाशिक, कोकण, पालघर, धुळे आदी भागातील शेतकरी सामील होणार आहेत. या मोर्चाच्या माध्यमातून मनसे काही प्रमुख मागण्या करणार आहेत.
ठाणे शहरामध्ये राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी शंभर स्टॉल उभा करावेत. हे स्टोल त्या शेतकऱ्यांना देऊन तिथे फळे आणि भाज्यांची विक्री करण्याची परवानगी द्यावी. तसेच ज्या आंबे विक्रेत्याचा स्टॉल तोडण्यात आला, त्याला नुकसानभरपाई देण्यात यावी. तसेच त्या स्टॉल विक्रेत्याकडे २० हजारांची मागणी करणाऱ्या नगरसेवकांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली आहे.