ठाणे MNS Warning Toll Administration :टोलचा झोल म्हणत टोल नाक्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या मनसेनं टोल प्रशासनाविराधात पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतलीय. एक ऑक्टोबरपासून होणारे टोल वाढीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जोरदार विरोध केला केलाय. एक रुपया जरी टोल वाढवला तर आमच्याशी गाठ आहे, असा धमकीवजा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी टोल प्रशासनाला दिलाय. यासंबंधी आपल्या मागण्यांचं निवेदन मनसेतर्फे टोल प्रशासनाला देण्यात आलंय. (Thane Toll Plaza News)
टोल प्रशासनाला इशारा : ठाणे शहरात कोणत्याही बाजूने प्रवेश करताना तसंच बाहेर जाताना वाहनांना टोल (Thane Toll Plaza) भरावा लागतो. गेली अनेकवर्षे प्रत्येक पक्षानं याविरोधात आंदोलन करत आवाज उठवला. या टोल नाक्यांच्या विरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं देखील मोठं आंदोलन उभारलं होतं. तसंच मनसेनं टोल नाक्यांवर दरदिवशी गोळा होणाऱ्या टोलची आकडेवारीही जाहीर केली होती. अशातच आता एक ऑक्टोबरपासून टोल प्रशासनानं टोल दरात वाढ करण्याचा निर्णय घेताच मनसे पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आलीय. मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह कोपरी आनंदनगर टोल नाक्यावर धडक दिली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मनसेनं टोल प्रशासनाला दिलेल्या निवेदनात एक तारखेपासून टोल दरात होणारी संभाव्य दरवाढ त्वरित मागे घ्यावी व नागरिकांना सर्व सुविधा द्याव्यात, अन्यथा आमच्याशी गाठ आहे असा धमकीवजा इशारा टोल प्रशासनाला दिलाय.