महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मलंगगडावर जाण्यासाठी निघालेल्या मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना अटक - मलंगगड प्रकरण न्यूज अपडेट

श्री मलंगगडावर विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते रविवारी रात्री साडेसात वाजता आरती करीत असताना दोन गट आमने-सामने आले होते. विशेष म्हणजे यावेळी दुसऱ्या गटाने घोषणाबाजी केली व मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांना धक्काबुक्की केली होती. दरम्यान या प्रकारानंतर आज मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे मलंगगडावर जाण्यासाठी निघाले होते, त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

अविनाश जाधव यांना अटक
अविनाश जाधव यांना अटक

By

Published : Mar 31, 2021, 5:33 PM IST

ठाणे - श्री मलंगगडावर विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते रविवारी रात्री साडेसात वाजता आरती करीत असताना दोन गट आमने-सामने आले होते. विशेष म्हणजे यावेळी दुसऱ्या गटाने घोषणाबाजी केली व मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांना धक्काबुक्की केली होती. या प्रकरणी दोन्ही गटाच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी कार्यकर्त्यासह आज मलंगगडावर जाऊन आरती करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी त्यांना काकडवाल गावाजवळ अडवून नेवाळी पोलीस चौकीत आणले. त्यावेळी मनसेच्या काही कार्यकत्यांची पोलिसांशी शाब्दिक चकमक झाली. दरम्यान यावेळी जाधव यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते असल्याने, कोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी जाधव यांना अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे.

अविनाश जाधव यांना अटक

२७ एप्रिलला पुन्हा मलंगगडावर जाणार

दरम्यान सध्या अविनाश जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र आपण पुन्हा एकदा 27 एप्रिलला मलंगगडावर जाणार असून, आरती करणार असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. त्यांनी त्या संदर्भातील पोस्ट फेसबूकवर टाकली आहे.

काय घडलं त्या रात्री मलंग गडाच्या दर्ग्यात

उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हाजी मलंग बाबा पहाड दर्ग्यावर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे राजेश गायकर, अजय भंडारी, अरुण साळवे, रमेश पाटील, गणेश फुलोरे यांच्यासह १५ ते २० जण रविवारी रात्री साडेसात वाजता आरती करत होते. त्यावेळी पहाडी परिसरात राहणारे मुन्ना शेख, झाकीर शेख, मोहम्मद अली, गुरू शेख, हुसेन अन्सारी, तौकीक मुनिर शेख, सरफरोज शेख यांच्यासह २० ते २५ जणांनी आरतीच्या ठिकाणी रात्री आठ वाजता धाव घेतली. त्यांनी आरती करणाऱ्या विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसमोर घोषणाबाजी केली व त्यांच्या अंगावर धावून गेले, असा दावा विहिंपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

दर्गा परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला

सरकारी नियमात अडथळा व कोरोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी मुन्ना शेख यांच्यासह २० ते २५ जणांवर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच विनापरवाना व नियमाचे उल्लंघन करून, दर्ग्यावर आरती करणाऱ्या विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या राजेश गायकर यांच्यासह १५ ते २० जणांवरही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दर्गा परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

हेही वाचा -एमआयएमच्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का? मनसेची इम्तियाज जलील यांच्यावर टीका

ABOUT THE AUTHOR

...view details