मीरा भाईंदर (ठाणे) - टँकर माफियांना पाणी भेटते मग घरच्या नळाला पाणी का येत नाही, असा सवाल मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे. शहरातील रखडलेल्या समस्यांबाबत आज (बुधवारी) मनसे नेते अविनाश जाधव यांनी महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांची भेट घेतली. अनधिकृत बांधकामे, पाणी प्रश्न, कोविड संदर्भात, शहरात सीसीटीव्ही कॅमेरे, रस्त्यावरील खड्डे अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. लवकरच आयुक्त हे सर्व विषय मार्गी लावतील, अशी माहिती पत्रकार परिषदेत मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली.
मनसे नेते अविनाश जाधव पत्रकार परिषदेत बोलताना. मीरा भाईंदर शहरातील अनधिकृत झोपडपट्टी वाढत आहेत. पाण्याचा प्रश्न जटिल होत चालला आहे. शहरात टँकर लॉबी सक्रिय आहे. प्रमुख रस्त्यावरील सिग्नल बंद आहेत. अग्निशमन दलाचे कर्मचारी, सफाई कामगार, परिवहन सेवेतील कर्मचारी यांचा पगार रखडलेला आहे. या सर्व समस्या अविनाश जाधव यांनी आयुक्तांची भेट घेऊन निदर्शनास आणल्या.
शहरातील अनेक भागात अनधिकृत झोपडपट्टी बांधकामे वाढत आहेत. त्यामुळे भविष्यात यांचा त्रास शहराला तसेच प्रशासनाला सुद्धा होणार आहे. मात्र, ज्यावेळेस हे अनधिकृत बांधकामे तयार होत असतात तेव्हा प्रभाग अधिकरी, प्रशासन कुठे असते? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वेळीच अनधिकृत बांधकामे अंकुश लावले तर येणारे संकट टळेल.
शहरातील पाण्याचा प्रश्न जटिल होत चालला आहे. त्यात स्थानिक स्तरावरील सर्व राजकीय नेते आपली पोळी भाजत आहे. अमुक एमएलडी पाणी आणले. मात्र, सत्यात शहरातील नळाला 40 तासांनी पाणी येते, असेही जाधव म्हणाले. तर याबाबतीत लवकरच पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, असे आयुक्त डॉ. विजय राठोड म्हणाले. दरम्यान, येणाऱ्या आठ दिवसात टॅंकर माफिया यांचे पितळे उघड करणार असल्याचेही जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी मनसे कामगार नेते संदीप राणे उपस्थित होते.