ठाणे -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उत्सव अणि सोहळ्यासाठी निर्बंध लादण्यात आले आहे. मात्र, दुसरीकडे हिंदूंचा सण म्हणून दहीहंडी हा सण साजरा करणार असल्याची भूमिका मनसेच्या वतीने घेण्यात आलेली आहे. त्यासाठी मनसेने जो स्टेज नौपाडा भागातील भगवती शेलच्या पटांगणात बांधला होता तो काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात ठाणे पोलीस आले होते. त्यामुळे मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्षांसह स्टेजवर साखळी उपोषण करण्यास बसले होते. मात्र, याठिकाणी बसलेल्या सर्व जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतरदेखील काही मनसैनिक मैदानातून हटले नाही. त्यानंतर त्यांना देखील पोलिसांनी गाडीत टाकले. यावेळी कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तर कितीही आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असून आम्ही दहीहंडी हा सण साजरा करणार असल्याची माहिती मनसेचे अविनाश जाधव व पदाधिकारी यांनी दिली.
मनसेचे म्हणणे काय?
आमदार, खासदार यांच्या मुलांच्या लग्नाला गर्दी होत नाही. शिवसेनेचे पदाधिकारी जेव्हा मोर्चा-मेळावा घेतात तेव्हा कोरोना पसरत नाही आणि हिंदूंचे सण येताच मात्र तिसरी लाट येईल, अशी शक्यता राज्य सरकारतर्फे वर्तविली जाते. याचा मी निषेध करतो, असे अविनाश जाधव म्हणाले. सरकार नालायकासारखे हिंदु सणांवर बंदी घालत असून पोलिसांना पुढे करून कारवाई करत असल्याचा त्यांनी निषेध केला. हिम्मत असेल तर पोलिसाला बाजूला करून समोर यावे, असे थेट आवाहन यावेळी अविनाश जाधव यांनी राज्य सरकारला दिले.