महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिडकोविरोधात नवी मुंबईत मनसेचे बोंबा मारो आंदोलन - navi mumbai CIDCO

जवळपास ६००० सिडको सोडतधारकांनी पूर्ण रक्कम भरलेली असताना देखील घरांचा ताबा अजून सिडकोने दिला नाही. त्यामुळे सिडकोविरोधात मनसेने आंदोलन केले आहे.

MNS agitation
नवी मुंबईत मनसेचे बोंबा मारो आंदोलन

By

Published : Jun 1, 2021, 5:23 PM IST

Updated : Jun 1, 2021, 10:29 PM IST

नवी मुंबई -सिडकोने २०१८-१९ मध्ये दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी जवळपास १८००० घरांची लॉटरी काढली होती. या लोकांना सिडकोने जाहीर केल्याप्रमाणे ऑक्टोबर २०२० ला घराचा ताबा मिळणे अपेक्षित होते. परंतु जवळपास ६००० सिडको सोडतधारकांनी पूर्ण रक्कम भरलेली असताना देखील घरांचा ताबा अजून सिडकोने दिला नाही. त्यामुळे सिडकोच्या व राज्य सरकारच्या विरोधात मनसेने आवाहन केल्याप्रमाणे बोंबा मारो आंदोलन करण्यात येत आहे. याविरुद्ध मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने नवी मुंबई मनसे मध्यवर्ती कार्यालयात आणि हजारो सोडतधारकांनी घरी बसून बोंबा मारो आंदोलन केले.

नवी मुंबईत मनसेचे बोंबा मारो आंदोलन

देखभाल दुरुस्ती खर्च माफ करण्याची मागणी:

मनसेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सिडकोने १ जुलै पासून घरांचा ताबा टप्प्याटप्प्याने देण्याचे मंजूर केले. त्यामुळे या ६००० हजार सोडतधारकांना किमान ९ महिने घराचा ताबा उशिराने मिळत आहे. जवळपास सर्व सोडतधारकांनी कर्ज काढून सिडकोला पैसे दिले आहेत. या घरांचे नियमित हप्ते या सोड्तधारकांना भरावे लागत आहेत. तसेच घर नसल्यामुळे भाड्याचे पैसे हि द्यावे लागत आहेत. त्यामुळे हे सोड्तधारक दुहेरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेकांचे ६० हजार ते १ लाख रुपये आर्थिक नुकसान उशिरा घराचा ताबा मिळाल्यामुळे होणार आहे. अशा परिस्थितीत सिडको या सोडत धारकांना देखभाल व दुरुस्ती खर्चापोटी आकारात असलेले ५८ हजार रुपये माफ करावे, अशी रास्त मागणी हे सोडतधारक करत आहेत.

हेही वाचा -विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या दारी! गिरीश महाजनही होते उपस्थित

जवळपास ७ हजार ट्विट सिडको विरोधात करण्यात आले:

मनसेने १२ मे रोजी त्या संदर्भात पत्र मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथजी शिंदे आणि सिडको व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांना पाठवले होते. त्यावर अजून सिडकोचे उत्तर आले नाही. २६ मे रोजी #CidcoWaiveOffOtherCharges हा हॅशटॅग वापरून सिडको आणि सरकारविरुद्ध जोरदार मोहीम राबवली. जवळपास ७ हजार ट्विट करण्यात आले.

सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना:

हजारो सिडको सोडतधारकांनी सरकार आणि सिडकोला झोपेतून जागे करण्यासाठी बोंबा मारो आंदोलन केले. या अनेक सोडतधारकांनी आपल्या परिवारासोबत घरातूनच निषेधाचे फलक दाखवले आणि आपला निषेध व्यक्त करून बोंबा मारून व्हिडिओ तयार केले. या आंदोलनाचे फोटो, व्हिडिओ काढून ते फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अशा सोशल मीडिया वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सिडको व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांना टॅग करून मोठ्या प्रमाणात प्रसारित केले. आंदोलन करताना काही सोड्तधारकांनी अभिनेत्याच्या आवाजात मिमिक्री करून आपली मागणी मांडली , तर काहींनी व्यंगचित्रे काढून आपल्या भावना व्यक्त केल्या. सोड्तधारकांनी आपल्या लहान मुलांना सोबत घेऊन परिवारासोबत बोंबा मारो आंदोलन करून आपल्या भावना किती तीव्र आहेत, ते दाखवून दिले.

मनसेच्या माध्यमातून मध्यवर्ती कार्यालयाबाहेर आंदोलन:

मनसे शहरअध्यक्ष गजानन काळे आणि सहकाऱ्यांनी सीवूड्स मधील नवी मुंबई मनसे मध्यवर्ती कार्यालयाबाहेर बोंबा मारो आंदोलन केले. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी काळी फीत बांधून बोंबा मारो आंदोलन केले. "सिडकोने देखभाल दुरुस्ती खर्च माफ केलाच पाहिजे ... केलाच पाहिजे", "आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा", "राज्य सरकार जागे व्हा..जागे व्हा...जागे व्हा " अशा घोषणा मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. आमदार निवासाच्या दुरुस्ती साठी सरकार हजारो कोटी रुपये खर्च करते, परंतु गोर गरीबांचे हक्काचे पैसे माफ करायला सरकार कडे पैसे नाहीत हि शोकांतिका आहे. अशी प्रतिक्रिया गजानन काळे यांनी दिली.

हजारोंच्या संख्येने बोंबा मारो आंदोलन केल्या नंतर सरकार आणि सिडकोने देखभाल दुरुस्ती खर्च माफ नाही केला तर पुढचे आंदोलन मंत्र्यांच्या घरी करू असा इशारा मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी राज्य सरकारला दिला.

हेही वाचा -सुशांतसिंग ड्रग्ज प्रकरण : मुंबईतील न्यायालयाकडून सिद्धार्थ पिठानीच्या एनसीबी कोठडीत 4 जूनपर्यंत वाढ

Last Updated : Jun 1, 2021, 10:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details