ठाणे- कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. शहरातील वाढते उद्योग, शाळा कार्यालय यामुळे रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे. मात्र, रस्ते खराब झाल्याने नागरिकांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र, याकडे लोक प्रतिनिधींनी लक्ष देण्याएवजी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केला जात आहे. सध्या याप्रकरणी मनसे आणि सेनेत कलगीतुरा रंगला आहे.
माहिती देतान आमदार राजू पाटील, नगरसेवक कुणाल पाटील आणि नागरिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी ठाण्यात बैठकीसाठी आले होते. त्यापूर्वी रविवारी रात्रभर पावसात स्वतः पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी रस्त्यावर उभे राहून ठाण्यातले खड्डे भरून घेतले. ही बातमी पाहून कल्याण डोंबिवलीतलेही खड्डे भरायचे असतील, तर मुख्यमंत्र्यांनी सहज एक फेरफटका डोंबिवलीतही मारावा, असे आवाहन मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विटरवर केले होते. त्यावर, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी आमदारांनी ट्विटरमधून बाहेर पडून सहज मतदारसंघात फेरफटका मारावा म्हणजे समजले की, खड्डे भरणीचे काम कुठे सुरू आहे. अशी पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आज पुन्हा आमदार राजू पाटील यांनी खासदार शिंदेंवर टीका करीत खासदारांच्या बंगल्यासमोर उभे राहून त्यांच्या बंगल्यासमोरच खड्डे पडल्याचे सांगत, मला कोणी मतदारसंघात फेरफटका मारावा म्हणून सांगू नये, कारण हेच माझे घर आहे. त्यामुळे, आधी खड्डे बुजवा, असे पुन्हा सेना नेत्यांना टोला लगावला आहे.
त्यामुळे, खड्ड्यांचा विषय बाजुलाच राहिला त्याएवजी नेत्यांमध्येच टीका टिपणी सुरू झाली आहे. आता यात अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांची देखील भर पडली आहे. पाटील यांनी पालिकेला धारेवर धरून रस्ता दुरुस्त न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
वर्षभरापासून राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे कल्याण-शीळ मार्गाच्या रुंदीकरणाचे आणि काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या रस्त्याची कामे आधुनिक तंत्रज्ञान वापरून वेगाने पूर्ण केली जात असल्याचा दावा राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वारंवार करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात परिस्थिती तशी नाही. या रस्त्याची कामे संथ गतीने सुरू आहे. तसेच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल वाहतूक बंद असल्याने कल्याण-डोंबिवलीतून मुंबई-ठाण्यातील कार्यालयात जाणारे कर्मचारी सध्या खासगी वाहनाने या रस्त्याचा वापर करून कार्यालय गाठत आहेत. त्यामुळे रोज सकाळ आणि सायंकाळच्या वेळी या रस्त्यावर वाहनांचा भार वाढला आहे. त्यातच पावसामुळे या रस्त्यावर खूप खड्डे पडले असून रस्त्यावरील डांबरही वाहून गेले आहे. त्यामुळे, टाळेबंदी शिथिल झाल्यापासून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.
कल्याण पूर्वेकडील मलंग गड रोड येथील द्वारली गावाजवळील रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. मागील काही वर्षात या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडले असून या अपघातात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. यंदाच्या पावसाळ्यात देखील या रस्त्याची खड्ड्यामुळे दुरावस्था झाली असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नगरसेवक कुणाल पाटील यांनी स्वतः या रस्त्याची पाहणी केली असता आजही तशीच परिस्थिती असल्याचे निदर्शनास आले.
महानगरपालिका प्रशासनाला नागरिकांची चिंता नाही. दर वेळी मी हा मुद्दा उचलतो व दर वेळी मला उडवाउडवीची उत्तरे मिळतात, असे कुणाल पाटील यांचे म्हणणे आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी गेल्या ३ महिन्यांपासून सातत्याने पालिका प्रशासनाकडे तक्रारी तसेच पाठपुरावा करून देखील प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नगरसेवक कुणाल पाटील यांनी केला आहे.
हेही वाचा-खळबळजनक! गणपती, गाडी खरेदीच्या वादातून पतीचा पत्नीवर कैचीने वार