मीरा भाईंदर(ठाणे)- एका संशयित रुग्णाचा वैद्यकीय अहवाल चुकीचा दिल्या प्रकरणीं रुग्णाला घेऊन मनसेने अतिरिक्त आयुक्त दालनात मंगळवारी ठिय्या आंदोलन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त महेश वरूडकर यांनी शांत राहण्याची विनंती केली. परंतु, मनसे कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी थेट खुर्ची सोडून जमिनीवर मांडी घालून अतिरिक्त आयुक्त यांच्या दालनात अर्धा तास बसून ठिय्या केला. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत. परंतु कोणत्याही प्रकारची मदत प्रशासन करत नसल्याचा आरोप मनसेने केला.
मीरा भाईंदर पालिकेत मनसेचे ठिय्या आंदोलन मीरारोड भागातील हेमराज सोसायटीतील ग्रीन व्हिलेज बिल्डिंग नंबर २२ मधील तीन सदनिका कुटुंबातील प्रत्येकी ५ व्यक्तीची ६ जुलै रोजी कोविड चाचणी मीरा भाईंदर आरोग्य विभागाकडून करण्यात आली होती. ८ जुलै रोजी प्रशासनाकडून प्रत्येक सदनिकामधील तीन जणांचा कोविड वैद्यकीय अहवाल सकारात्मक आहे, असे सांगण्यात आले. सदनिकामधील एका सदस्यांनी प्रशासनाला सांगितले की, आम्हाला शंका आहे कोणतेही लक्षणे नसल्यामुळे आम्ही स्वखर्चाने खासगी प्रयोगशाळेतून चाचणी करणार आहोत, त्यानंतर वैद्यकीय अहवाल आल्यावर ठरवू असे सांगण्यात आले. परंतु, आपल्याला विलगीकरण करावे लागेल असे आरोग्य विभागाकडून स्पष्ट सांगण्यात आले.
१० जुलै रोजी या कुटुंबातील सदस्यांना मीरा भाईंदर कोविड केयर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु सदर वैद्यकीय अहवाल चुकीचा आहे अशी शंका या कुटुंबाला आली आणि सदनिकामधील एका कुटुंबातील पाच सदस्यांनी मुंबईतील मेट्रोपोलीस प्रयोगशाळेतून ९ जुलै रोजी कोविड चाचणी केली. १० जुलैला काही व्यक्तींचा कोविड अहवाल नकारात्मक आला. त्यानंतर या सर्व कुटुंबातील सदस्यांनी मीरा भाईंदरमधील मनसे कार्यकर्त्याना ही सविस्तर माहिती दिली. त्यानंतर मंगळवारी मनसेने थेट मीरा भाईंदर मुख्यालय गाठले आणि अतिरिक्त आयुक्तांना जाब विचारला, व दालनातच ठिय्या मांडला.
त्यानंतर या कुटुंबातील सदस्यांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणी चौकशी करून पुढील तीन दिवसात अहवाल सादर करू, असे अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून सांगण्यात आले. त्यानंतर मनसेने ठिय्या आंदोलन मागे घेतले.
धक्कादायक म्हणजे कुटुंबातील एका सदस्यांची कोविड चाचणी केली नसून तरीही ती व्यक्ती सकारात्मक आहे असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला. तसेच मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. मीरा भाईंदर आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आल्याचे चित्र दिसून आले. या प्रकरणी मनसे नेते संदीप राणे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, कोरोना विषयी पालिकेच्या गलथान कारभारामुळे शहरातील नागरिक कोरोना आजारापेक्षा मानसिक रुग्ण होत चालले आहेत. या संदर्भात प्रशासनानी गंभीर दखल नाही घेतली तर मनसे तीव्र आंदोलन करेल, असा इशारा ही यावेळी राणे यांनी दिला.