ठाणे- निवडणुका म्हणजे निव्वळ मॅच फिक्सिंग असून त्या लढण्यात काहीच अर्थ नसल्याचे सांगत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी 'पारदर्शक मतदान हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच', अशी घोषणा आंदोलकांनी दिली. तसेच यावेळी मनसे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत टिळकांच्या वेषात आंदोलनात सहभाग नोंदवला.
दरम्यान, बॅलेट पेपरवर मतदानासाठी संपूर्ण देशातील विरोधी पक्ष एकत्र आणण्याचे काम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हाती घेतले आहे. या प्रयत्नाला यश यावे, यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोनिया गांधींपाठोपाठ तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. त्यामुळे राज ठाकरे यांच्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी मनसैनिकही आक्रमक झाले आहेत.