ठाणे- एकीकडे कोरोनामुळे सर्वच पालिका, नगरपालिकांना आर्थिक फटका बसला असताना आता ठाणे पालिका अधिकाऱ्यांनीच कोरोना अँटीजेन किट घोटाळा केला असल्याचा आरोप ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी केला. त्याबाबत एक व्हिडिओही त्याच्या हाती लागला आहे.
मनसेचा पालिका प्रशासनावर गैरव्यवहाराचा आरोप कोविड चाचणी करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने जवळपास एक लाख अँटीजेन चाचणी किट तातडीने विकत घेण्यात आल्या होत्या. एका चाचणी किटची किंमत सहाशे रुपये असून नागरिकांना ही चाचणी मोफत करून देण्यात येत होती. परंतु, मनसेचे अविनाश जाधव यांच्या हाती एक खळबळजनक व्हिडिओ लागला असून त्यात एक महिला हे अँटीजेन किटची सीलबंद पाकिटे फाडून टाकत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे हे पाकीट फोडल्यावर ते किट संपूर्णतः निकामी होते व त्याचा पुढे काहीही उपयोग होत नाही.
आयुक्त, महापौरांनी यात जातीने लक्ष द्यावे
सदर महिला दिवसाला दोनशे ते अडीचशे किट फोडून निकामी करत असल्याची खळबळजनक माहिती अविनाश जाधव यांनी दिली. कॅमेऱ्यात कैद झालेली ही घटना कोणत्या प्रभाग समितीतील आहे, याची शहनिशा अजून झाली नसली तरी आयुक्त आणि महापौरांनी यात जातीने लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. कोरोनाच्या काळात कोट्यवधी रुपयांचे साहित्य निविदा न काढता तातडीने मागविण्यात आल्या त्याला आम्ही आक्षेप घेत नाही. परंतु, अशाप्रकारे जर त्याची नासाडी होत असेल तर मात्र आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
या आधीही टाळेबंदी काळात मनसेने प्रशासनावर अनेक आरोप केले होते. मनसे नेते अविनाध जाधव आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कलगीतुरा रंगला होता. त्यानंतर सरकारी कामात अडथळा आणल्याचा जाधव यांच्यावर गुन्हा देखील प्रशासनाने दाखल केला होता. आता या आरोपानंतर प्रशासनाने आपली बाजू अजूनही मांडली नाही.