ठाणे - भिवंडी, कल्याण, ठाणे या मेट्रो प्रकल्प 5 अंतर्गत भिवंडी शहरातील नियोजित मेट्रो मार्गात बदल होण्याचे संकेत मिळाले होते. त्यानंतर मेट्रोच्या नियोजित मार्गाला भाजपचे स्थानिक आमदार महेश चौगुले व समाजवादीचे रईस शेख यांनी पाठिंबा दर्शवत मेट्रोला विरोध करणाऱ्यांना समाजकंटक असे संबोधले होते. यामुळे दोन्ही आमदार हे रिलायन्स व इतर बांधकाम व्यावसायिक यांच्या फायद्यासाठी काम करत असल्याचा आरोप कल्याण नाका व्यापारी व रहिवासी संघर्ष समितीने पत्रकार परिषदेत केला आहे.
नियोजित मेट्रो मार्गामुळे कल्याण रस्ता येथील तब्बल 1 हजार 200 व्यापारी व सुमारे 1 हजार 700 रहिवासी यांच्या मालमत्तांवर टाच येत होती. म्हणून बाधित व्यापारी-रहिवासी यांनी मागील तीन वर्षांपासून या प्रकल्पाच्या नियोजित मार्गास विरोध केला होता. तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शहर व ग्रामीण नागरिकांना फायद्याची ठरेल, यासाठी सदरचा मार्ग वंजारपट्टी, चाविंद्रामार्गे टेमघर कल्याणच्या दिशेने नेल्यास त्याचा फायदा अधिक नागरिकांना मिळू शकतो, असे संघर्ष समितीचे निमंत्रक शादाब उस्मानी यांनी स्पष्ट केले.
तसेच आमचा विरोध मेट्रोस नसून त्याचा मार्ग संपूर्ण शहरासाठी सोयीस्कर असा वंजारपट्टीवरून नेण्यासाठी आग्रह आहे. नियोजित कल्याण नाका येथील मार्ग हा छोट्या व्यापारी, गरीब कुटुंबीयांना उद्ध्वस्त करून बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठी आहे. या परिसरात 'रिलायन्स प्रोग्रेसिव्ह ट्रेडर्स प्रा ली'च्या नावे मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी केली असल्याने त्यांच्या फायद्यासाठी भिवंडीतील दोन्ही आमदार कल्याण रोडच्या मार्गास पसंती देत असल्याचा आरोप शादाब उस्मानी यांनी केला आहे.
या पत्रकार परिषदेत संघर्ष समितीचे राम लहारे, दिन मोहम्मद खान, मेहमूद मोमीन, राकेश पाल, सुधाकर अंचन, नईम खान, युसूफ सोलापूरकर, अनिल माणिकराव, नवीन गंगाराम, अस्लम हाफीजी , मुजाहिद शेख मैनूल शेख यांसह पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, भिवंडी शहरातील मेट्रो मार्ग मोठ्या प्रमाणावर रुंदीकरणामुळे सोयीस्कर नसल्याने मेट्रो भिवंडी शहराबाहेरून नेण्याचा घाट काही राजकारणी घालत असल्याच्या वावड्या उठविल्या गेल्या, तर या मार्गामुळे बाधित होणाऱ्या व्यासायिकांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मार्गात बदल करून तो वंजारपट्टी मार्गे नेण्याची मागणी केली आहे. त्यांनी यावर विचार करण्याबाबत सूतोवाच करताच शहरात नागरिकांमध्ये मेट्रो रखडण्याबाबतची भीती व्यक्त केली जात आहे.