ठाणे- भिवंडी शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण असताना आज (बुधवारी) शिवसेनेचे भिवंडी पूर्व मतदारसंघाचे आमदार रुपेश म्हात्रे यांनाच वाहतूक कोंडीचा सामना करत रस्त्यावर पायी चालत कार्यालय गाठावे लागले. सेनेच्या महिला मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून असणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांना खड्ड्यांचा सामना करीत कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचायला तब्ब्ल २ तास उशीर झाल्याचे समोर आले आहे.
आमदार रुपेश म्हात्रे यांनी पायी चालत कार्यलय गाठले. तर सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनाही खड्ड्यांचा फटका बसला. यंत्रमाग नगरी म्हणून ओळख असलेल्या भिवंडी शहराची नागरी समस्यांचे आगर म्हणून ओळख निर्माण झाली आहे. शहरात चोहीकडे रस्त्यावर खड्डे, कचऱ्याचे ढीग, फेरीवाले, दुकानदारांसह मुजोर रिक्षा चालकांचा रस्त्यावर कब्जा त्यामुळे होणारी शहरात वाहतूक कोंडी या प्रमुख समस्याने शहरातील नागरिक रोजच हैराण झाले आहे. आता लोकप्रतिनिधींनाही याचा फटका बसत असल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा - मध्यमवर्गीयांचे बजेट कोलमडले, कांद्यासह लसूणही महाग
या खड्ड्यांचा किस्सा त्या महिला पदाधिकारांनी आपल्या भाषणातही मांडला. त्या म्हणाल्या की, भिवंडीत कार्यक्रमाला येताना आमची कार सारखी खड्ड्यात जात होती. आम्हाला जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी कारमध्ये खायला लाडू दिला. मात्र, खड्यामुळे तो लाडू तोंडात न जाता आमच्या नाकात गेला, असे भाषणात सांगून शिवसेनेला घरचा आहेर दिला. यामुळे शहराच्या समस्यांना शिवसेना जबाबदार असल्याचे समोर आले आहे. मग गेल्या 10 वर्षात आमदार पदावर राहून रुपेश म्हात्रे यांनी काय केले? आणि दोन वर्ष महापालिकेत शिवसेनेची सत्ता असूनही त्यांनी काय केले? असा प्रश्न आजच्या घडलेल्या घटनेवरून पडत असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - ठाण्यात लोकलमधील गर्दीचे दोन बळी
भिवंडी महापालिकेत शिवसेनेची २ वर्षांपासून सत्ता आहे. एवढे काय त्यांचा भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात 10 वर्ष आमदारही आहे. मात्र, भिवंडी शहरात गेली पाच वर्षात खड्डयांचा प्रश्न जैसे थे आहे. त्यातच गेल्या ४ वर्षात खड्ड्यांनी २२ च्यावर नागरिकांचे जीव घेतले. तरीही पालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून आले आहे. शहरातील विविध समस्यांकडे स्थानिक सेना पदाधिकाऱ्यांना गांभीर्य नसल्याने आज शहराची अवस्था बकाल झाली आहे. असा सवाल आज शिवसेनेच्या आमदारसह महिला पदाधिकाऱ्यांसोबत घडलेल्या घटनेवरून विविध समस्यांनी ग्रस्त झालेल्या भिवंडीकरांनी केला आहे.