ठाणे - लॉकडाऊन काळात लोकांचे व्यवसाय आणि कार्यालये बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक चणचण भासत आहे. याच काळात वीज कंपन्यांनी पाठवलेल्या भरमसाट बिलांमुळे सामन्य जनतेचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. सामन्य जनतेला वीज बिलात दिलासा मिळावा यासाठी ३ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे वीज बिलाचा विषय मांडणार असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. याबाबत सरनाईक यांनी विधानसभा अध्यक्षांना एक पत्रही दिले आहे.
लॉकडाऊन काळात सामन्य माणसाला संसाराचा गाडा चालवणे अवघड झाले आहे. गेल्या चार महिन्यापासून सर्वांचे काम-धंदे ठप्प आहेत. त्यात वीज कंपन्यांनी भरमसाट बिले पाठवून ग्राहकांना शॉकच दिला आहे. अदानी, टाटा, महावितरण या कंपन्यांकडून आलेल्या भरमसाठी वीजबिलांमुळे सामन्य नागरिक हैराण झाले आहेत. चार महिन्यात कोणत्याही वीज कंपनीचा प्रतिनिधी मीटर रीडिंग घ्यायला आले नाही, मग बिल कोणत्या आधारे पाठवले आहे? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.