महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्रातील गडकिल्ले पार्ट्यांसाठी वापरायला कोणाच्या बापाची जहागीर नाही - आव्हाड - किल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयावर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्रातील किल्ल्यांचे रिसॉर्ट आणि हॉटेलमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.

जितेंद्र आव्हाड

By

Published : Sep 6, 2019, 3:01 PM IST

मुंबई - सरकारने महाराष्ट्रातील किल्ल्यांचे रिसॉर्ट आणि हॉटेलमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने संताप आणि राग अनावर होत आहे. महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर लग्न आणि पार्ट्या करण्यासाठी ते कोणाच्या बापाची जहागीर नाही, अशा शब्दात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला.

हेही वाचा - 'हा तर शिवबांचा, मावळ्यांचा अपमान; गड-किल्ल्यांना हात लावाल तर याद राखा'

राज्यातील किल्ल्यांचे हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) अशा २५ किल्ल्यांची यादी तयार करण्यात आली आहे. हे किल्ले करारावर हॉटेल व्यावसायिकांना रिसॉर्ट तसेच हॉटेल उभारण्यासाठी दिले जाऊ शकतात. ऐतिहासिक पर्यटनस्थळांची प्रसिद्धी लक्षात घेता पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचा आमदार आव्हाड यांनी कडाडून विरोध केला.

एमटीडीसीच्या किल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयावर टीका करताना जितेंद्र आव्हाड

हेही वाचा - पुण्यातील विशालने केले गड-किल्ल्यांचे हवाई चित्रीकरण; सह्याद्रीला चढवला राष्ट्रगीताचा साज

आमच्या पूर्वजांच्या रक्तातून लिहिला गेलेला इतिहास आहे तो! तेथील प्रत्येक दगड साक्षीदार आहे. त्या इतिहासाचा! किल्ल्यांवरी माती जी आम्ही डोक्याला लावतो ती ऊर्जास्त्रोत आहे. जिथे मॉ साहेबांचे, शिवरायांचे, संभाजी राजांचे पाय लागले. त्या मातीवर नंगानाच होऊ देणार नाही. रायगडावर गेल्यानंतर मॉ साहेब आणि शिवरायांमधील संभाषण आम्हाला आठवते, सिंहगडावर ‘गड आला पण सिंह गेला, हे आठवते, प्रतापगडावर गेल्यावर अफझल खानाचा काढलेला कोथळा आणि महाराजांवर कृष्णा कुलकर्ण्याने केलेला एकमेव वार, शिवा काशीद आठवतो. हा इतिहास मराठी मातीचा, आमच्या स्वाभिमानाचा, आमच्या अस्मितेचा आहे. त्या इतिहासाशी तुम्हाला खेळू देणार नाही. पक्ष, कार्यकर्ते, महसूल बाजूला गेले पण, ज्या इतिहासाने आम्हाला धडे दिले. ज्या इतिहासाने आम्हाला मार्ग दाखविला. ज्या इतिहासामुळे महाराष्ट्र जगभरात गेला. त्या इतिहासाशी खेळू देणार नाही, असे आव्हाड म्हणाले.

हेही वाचा - कोकण पर्यटनाला ग्रीन सिग्नल; पर्यटन विकास समितीची स्थापना

ते म्हणाले, लग्नासाठी, पार्ट्यांसाठी तुम्ही आमचे गडकिल्ले वापरणार? हे सरकार आहे तरी काय? ज्यांना शिवाजी महाराजांबद्दल प्रेम नाही, ज्यांना शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल आदर नाही. ज्यांना गड-किल्ल्यांवर सांडलेल्या रक्ताबद्दल-बलिदानाबद्दल आदर नाही. त्यांच्या हातात सरकार आहे म्हणून हे तुघलकी निर्णय घेऊ शकतात. या निर्णयाला आम्हीच नाही तर तमाम मराठी माणूस ज्यांना शिवरायांच्या भूमिबद्दल प्रेम आहे, मराठी मातीबद्दल अभिमान आहे. तो प्रत्येक जण या निर्णयाला विरोध करेल, हा माझा विश्वास आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details