महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमच्या ठाण्यात वाहतूक कोंडीत अडकलेल्या उद्धवजींची माफी मागतो - जितेंद्र आव्हाड - thane traffic

उद्धव ठाकरे हे मंगळवारी कल्याणहून ठाण्यात सभेसाठी येताना २ तास वाहतूक कोंडीत अडकले. यामुळे त्यांना सभेला यायला उशीर झाला.

जितेंद्र आव्हाड

By

Published : Apr 24, 2019, 5:14 PM IST

ठाणे- कल्याणवरून ठाण्यात येताना उद्धव ठाकरे हे सुमारे २ तास वाहतूक कोंडीत अडकले. त्यांच्याच शिलेदारांनी शहराची काय वाट लावली आहे हे त्यांच्या लक्षात आले असेलच पण, त्यांच्या भाषणात त्याचा उल्लेख त्यांनी केला नाही. तरीही आमच्या ठाण्यात ते वाहतूक कोंडीत अडकल्याने आम्हीच त्यांची माफी मागतो, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत लगावला.

ठाण्याच्या विकासावरून जितेंद्र आव्हाडांची उद्धव ठाकरेंवर टीका

उद्धव ठाकरे हे मंगळवारी कल्याणहून ठाण्यात सभेसाठी येताना २ तास वाहतूक कोंडीत अडकले. यामुळे त्यांना सभेला यायला उशीर झाला. शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाच्या बेजबाबदार वागण्यामुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीला दररोज सामोरे जावे लागते. उद्धव ठाकरे यांनाही याचा फटका बसल्याने त्यांना याची जाणीव झाली असेल की ठाणेकरांना आपल्या न केलेल्या कामाचा किती मोठा फटका बसतो आहे. ठाणे महापालिकेत २५ वर्षे एकहाती सत्ता असतानाही ठाणेकरांच्या पाण्यासाठी अत्यावश्यक असणारे शाई धरणाबाबत उद्धव ठाकरे काहीही बोलले नाहीत की शिवसेनेच्या जाहीरनाम्यात याचा साधा उल्लेखही केलेला नसल्याचे ते यावेळी म्हणाले.

मुंबईकरांना ५०० चौरस फुटांच्या घराला सवलत दिली असली तरी ज्या ठाण्याने शिवसेनेला सर्वात जास्त काळ सत्ता दिली. त्याच ठाण्याला शिवसेनेने दुय्यम वागणूक दिली आहे. एकूणच ठाणेकरांना गृहीत धरण्याचे काम उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेने केले आहे.

धोकादायक कोपरी पुलाचा प्रश्न गेल्या ५ वर्षांत मार्गी लागलेला नाही, रस्त्यांचा प्रश्नही तसाच पडला आहे. या प्रश्नांवर उद्धव ठाकरे एक शब्दही बोललेले नाहीत. उद्धव ठाकरे उत्तर द्या असा प्रश्न विचारून ठाणेकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना किती गंभीर आहे हे दिसून येते. मंगळवारी शिवसेनेच्या ठाण्यातील नेत्यांनी शहराची काय वाट लावून ठेवली आहे याचा अनुभव उद्धव ठाकरे यांना वाहतूक कोंडीत मिळाला. त्यामुळे त्यांनी आपल्या नेत्यांना खडसावायला हवे होते. मात्र, त्यांनी तसे न करता पुन्हा ठाणेकरांना त्याच नेत्यांच्या हाती सोडून मार्गक्रमण केले. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत. बाळासाहेब हे मुंबई-पुणे मार्गावर वाहतूक कोंडीत अडकले होते. त्यावेळी त्यांनी पुढाकार घेऊन शरद पवार यांच्या कल्पनेतील एक्स्प्रेस वे साकारला होता. आताही उद्धव यांनी काही तरी मार्ग दाखवण्याऐवजी त्याबद्दल चकार शब्द काढला नाही. तरीही आम्ही गोरगरीब ठाणेकरांच्यावतीने त्यांची माफी मागतो, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी मारला.

ABOUT THE AUTHOR

...view details