ठाणे - अंबरनाथ एमआयडीसीमधील एकाच कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुण आणि तरुणीच्या गेल्या 4 वर्षांपासून बेपत्ता होण्याचे रहस्य शोधण्यात कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांना यश आले आहे. प्रेम प्रकरणातून या तरुण-तरुणीने चक्क लग्न केल्याचे उघडकीस आले आहे.
चार वर्षापसून चोरून करत होते संसार -
31 मे 2017 रोजी कल्याण पश्चिमेत राहणारा शहबाज इंद्रीस शेख (22 वर्षे, रा. रोहीदासवाडा, गौसिया मस्जिदच्या बाजूला) हा बेपत्ता झाल्याची तक्रार त्याची आई जमीला इंद्रीस शेख (40) यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल केली होती. आदल्या दिवशी मुंबईतून कपडे घेऊन येतो, असे सांगून शहबाज गेला होता. तो परत घरी आला नाही. तेव्हापासून बाजारपेठ पोलीस त्याचा शोध घेत होते. रविवारी (20 जून 2021) पोलीस सय्यद अत्तार यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. याच शहबाज शेखने अंबरनाथ एमआयडीसीतल्या एका खासगी कंपनीत त्याच्यासोबत कंपनीत काम करणाऱ्या सीमा संदीप कोष्टी हिच्यासोबत लग्न केले आहे. सीमा हिच्या बेपत्ताबाबत मनमाड रेल्वे पोलीस ठाण्यात नोंद दाखल आहे. तर शहाबाद आणि सीमा हे मालेगाव येथे राहत होते. सद्या ते कोनगाव येथील तकवा मस्जिदच्या बाजूला राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.