ठाणे - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने मोठा गाजावाजा करत डोंबिवलीच्या स्व. सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडा संकुलात कोविड सेंटर सुरू केले आहे. मात्र, तेथील सुरक्षा यंत्रणा ढिसाळ असल्याचे एका रुग्णाने केलेल्या आत्महत्येतून समोर आले आहे. गुरुवारी सकाळी या कोविड सेंटरमधून पळालेल्या रुग्णाचा मृतदेह पश्चिम डोंबिवलीतील खाडीत आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
डोंबिवलीच्या मोठा गाव-ठाकुर्ली परिसरात राहणाऱ्या एका चावी बनवणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने त्यांना 20 जुलै रोजी स्व. सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडा संकुलातील कोविड सेंटरमध्ये दाखल केले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना 8 दिवसांनी घरी पाठवण्यात आले. मात्र, श्वास घेण्यास त्रास सुरू झाल्याने त्यांना पुन्हा याच सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.
हेही वाचा -मुंबईच्या आस्माची हजारो ख्वाहिशे ऐसी...फुटपाथवर राहून दहावीत मिळवले यश
गुरुवारी सकाळी 7 च्या सुमारास त्यांनी त्यांच्या एका मित्राला फोन केला. त्यानंतर मोबाईल तिथेच ठेऊन ते सेंटरच्या बाहेर पडले. त्यांचा मुलगा वडिलांच्या मोबाईलवर सतत संपर्क करत होता. मात्र, वडील प्रतिसाद देत नव्हते. म्हणून त्याने कोविड सेंटरशी संपर्क साधून वडील कुठे आहेत, याची माहिती विचारली. मात्र, तेथिल कर्मचाऱ्यांनी आम्हाला माहित नसल्याचे सांगितले. त्यामुळे मुलाने मानपाडा पोलीस ठाणे गाठले.
मानपाडा पोलिसांनी क्रीडा संकुलातील सेंटरवर जाऊन चौकशी केली असता त्यांनाही रुग्णाबद्दल काहीही माहिती नसल्याचे सांगितले. याच दरम्यान बेपत्ता झालेल्या आपल्या वडिलांचा मुलगा व त्याचे मित्र सर्वत्र शोध घेत होते. सदर व्यक्तीला खाडी किनारी फिरायला जाण्याची सवय होती. त्यामुळे मुलगा मित्रांसह मोठागावच्या खाडीकडे गेला. तिथे पोलिसांसह बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. जवळ जाऊन मृतदेह पाहिला असता मुलाने आपल्या वडिलांना ओळखले. या संदर्भात विष्णूनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली. त्यानंतर सदर व्यक्तीच्या मृतदेहावर पाथर्लीच्या स्मश्यानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
या संदर्भात मृत व्यक्तीच्या मुलाने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना तक्रार केली आहे. कोविड सेंटरमधून बाहेर पडलेल्या वडिलांनी खाडीत उडी घेऊन आत्महत्या केली. रुग्णाच्या नातेवाईकांना सेंटरमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात येत असतो. मात्र, रुग्णाला सेंटरबाहेर पाठवतात कसे किंवा रुग्ण सेंटरच्या बाहेर जातोच कसा ? यावरून तेथील व्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणा कुचकामी असल्याचा आरोप मुलाने केला. शिवाय तेथील कर्मचारी-अधिकारीही व्यवस्थित उत्तरे देत नसल्याचा आम्हाला अनुभव आल्याचे मुलाने सांगितले. या संदर्भात कोविड सेंटरशी संपर्क साधला असता प्रतिक्रिया देण्यास एकही वैद्यकीय अधिकारी उपलब्ध झाला नाही.