ठाणे-जिल्हातील कोपरी येथील मिठागर खाडी परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या आणि बेपत्ता झालेल्या दोन मुलांचे मृतदेह रविवारी सापडले. या घटनेनंतर कोपरी परिसरात शोकाकुल वातावरण तयार झाले आहे. दोन्ही मुलांची बेपत्ता असल्याची तक्रार कोपरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
बेपत्ता मुलांचे मृतदेह सापडले मृतक शुभम देवकर (वय, 15) आणि प्रवीण कंचारी (वय, 15) असे मृत मुलांची नावे आहेत. ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलिसांनी या दोन्ही मुलांचे मुतदेह रविवारी शोधून काढले. ही दोन्ही मुले शनिवारी पोहण्यासाठी गेले होते. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने या मुलांच्या बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. शुभम देवकर आणि प्रवीण कंचारी हे दोघेही कोपरीच्या सुभाष नगरचे रहिवासी होते. शनिवारी दुपारी कोपरी येथील मिठागर खाडीत घरी न सांगता ही मुले पोहण्यासाठी गेले होते. यानंतर दोघेही बेपत्ता झाले. त्यांचा शोध सुरू केला असता दोघांचे कपडे खाडीच्या किनाऱ्यावर आढळून आले. यानंतर ठाणे पालिका आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलिसांनी या दोघांचा खाडीत शोध सुरू केला. यावेळी रविवारी दोन्ही मुले मृत अवस्थेत पोलिसांना आढळून आले. कोपरी पोलिसांनी हे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. पाण्यात पोहण्यासाठी गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.