मीरा भाईंदर(ठाणे)- मीरा भाईंदर महानगरपालिकेची झुम अॅपच्या माध्यमातून महासभा पार पडली. गेल्या पाच महिन्यापांसून महासभा झाली नसल्यामुळे झुम अॅपद्वारे ऑनलाइन विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या सभेत विकासाकामांबाबत चर्चा कमी आणि सर्व पक्षाच्या नगरसेवकांच्या गप्पा-टप्पा जास्त रंगल्याचे चित्र पाहायला मिळाले. 11 वाजता सुरू होणारी सभा एक तास उशिराने सुरू झाली. मात्र, काही नगरसेवक तांत्रिक अडचणीमुळे सामील होऊ शकले नाहीत. अनेक नगरसेवकांनी यापूर्वीच ऑनलाइन सभेला विरोध दर्शविला होता.
सभा सुरू झाल्यानंतर सर्व अधिकारी, नगरसेवक आवाज येत नाही दिसत नाही हेच कारण देत होते. यामुळे शहरातील कोणत्याही विकासकामांवर ठोस चर्चा झाली नाही. यामध्ये सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना बोलण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला नाही, असा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. यामुळे यावर्षीची घरपट्टी, पाणीपट्टी शंभर टक्के माफ करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली. तर सत्ताधारी पक्ष भाजकडून 50 टक्के सूट देण्यात यावी, असा ठराव मांडला गेला व त्याला मंजरी मिळाली. पण, नियमाप्रमाणे 10 टक्क्यांपेक्षा जास्त मालमत्ता करात सवलत देऊ शकत नाही, असा उल्लेख अतिरिक्त आयुक्त महेश वरूडकर यांनी सभेत केला.
विशेष ऑनलाइन महासभेत एकूण 96 पैकी 83 नगरसेवक उपस्थित होते. यामध्ये 78 नगरसेवक ऑनलाइन चर्चेत दिसून आले. पण, शहरातील प्रलंबित विकासकामे जनतेने प्रश्नसाठी भरविण्यात आलेली महासभेत सत्ताधारी भाजपकडून अनेकांना आपले मत मांडण्यास संधी मिळाली नाही. तर वारंवार हात वरती करून बोलण्यास संधी द्या, अशी मागणी असताना बोलु दिले नसल्याने भाजपच्या जेष्ठ नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. ठराविक नगरसेवकांना बोलण्यास संधी दिली जात आहे, असा आरोप करत सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका रिटा शहा यांनी घरचा आहेर दिला. काही नगरसेवक तांत्रिक बाबी मुळे सहभागी होऊन देखील स्पष्ट मत मांडू शकले नाही.
मीरा भाईंदर महापालिकेची महासभा 'ऑनलाइन', विकासकामांपेक्षा नगरसेवकांच्या गप्पाच रंगल्या - meeting of Mira Bhayander Municipal Corporation news
मीरा भाईंदर महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने झूप अॅपवर झाली. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या टाळेबंदीमुळे नागरिकांकडे पुरेसे पैसे नाही, असे कारण सांगत काँग्रेसने पाणीपट्टी शंभर टक्के माफ करावी, अशी मागणी केली होती. पण, भाजपने 50 पाणीपट्टी माफ करण्याचा ठराव मंजूर केला. मात्र, पुरेसा निधी नसल्याने 10 टक्क्यांपेक्षा जास्त सवलत देता येणार नाही, असे अतरिक्त आयुक्त महेश वरूडकर म्हणाले.
महासभेत विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी महापौर, स्थायी समिती सभापती स्वेच्छा निधी कोरोनाच्या कामात वापरण्यात यावा. तसेच दिवंगत बाळासाहेब ठाकरे व दिवंगत प्रमोद महाजन कलादालनासाठी एक समान निधी ठेवण्यात यावा. त्याचबरोबर परिवहन सेवा लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी केली.
तर शिवसेनेच्या गटनेत्या निलम ढवन यांनी सत्ताधारी पक्षाला चांगलेच धारेवर धरले. परिवहन सेवा सुरू करावी अन्यथा ठेकेदार तयार नसेल तर त्याला काळ्या यादीत टाका, अशी मागणी महापौर जोस्ना हसनाळे यांच्याकडे केली. यावेळी गटनेत्या ढवन आणि भाजपचे नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांचा अॅड. ध्रुवकिशोर पाटील, असा उल्लेख केल्याने खळबळ उडाली. भाजपचे नगरसेवक परिवहनच्या ठेकेदाराला मदत करून सामान्य जनतेला वेठीस धरत आहे, असे आरोप करत परिवहन सेवा लवकरात लवकर परिवहन सेवा सुरू करावी, अशी मागणी केली. यावर महापौर जोस्ना हसनाळे यांनी उत्तर देत आजपासून परिवहन सेवा सुरू होईल, असे आश्वासन दिले.