मीरा-भाईंदर (ठाणे) -महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता आहे. यासाठी आज महापालिका आयुक्त दिलीप ढोले व पोलीस उपायुक्त अमित काळे यांची पालिका आयुक्तालयात बैठक झाली.
दरम्यान महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला, त्यासाठी त्यांनी आरोग्य अधिकारी आणि प्रभाग अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवण्यासंदर्भात आयुक्तांनी सूचना दिल्या. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध घेऊन, 48 तासांत त्याची कोरोना चाचणी झाली पाहिजे असे आदेश देखील यावेळी आयुक्तांनी दिले आहेत.
नियम मोडणाऱ्यांवर होणार कारवाई
मीरा-भाईंदर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिक कोरोनाचे नियम पाळत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता शहरात एकूण 17 पथके नेमण्यात आले आहेत. या पथकांच्या माध्यमातून नागरिकांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश या पथकाला आयुक्त दिलीप ढोले यांनी दिले आहेत. प्रत्येक विभागामध्ये दोन पथकांची नियुक्त करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त व पोलीस उपायुक्तांची बैठक 4 लाखांच्या दंडाची वसूली
संपूर्ण क्षेत्रात जमावबंदी लागू आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे नागरिकांनी नियमाचे पालक केले पाहिजे. अनेक ठिकाणी पोलिसांनी दंडात्मक कारवाईसह गुन्हे देखील दाखल केले आहेत. मीरा - भाईंदर शहरात आतापर्यंत ९४ अस्थापनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर विना मास्क फिरणाऱ्या 1350 नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यातून 4 लाख रुपयांचा दंड वसूल झाल्याची माहिती उपायुक्त अमित काळे यांनी दिली. तसेच नागरिकांनी मास्क परिधान करावे, कोरोनाच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
हेही वाचा -ऑक्सिजन सिलिंडरच्या मागणीत वाढ, गॅस एजन्सीसमोर वाहनांच्या रांगा