मीरा भाईंदर (ठाणे)- गेले काही दिवस मीरा भाईंदर शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पाणी प्रश्नावर आज (दि. 19 ऑक्टोबर) मंत्रालयात राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बैठक बोलावली होती. मीरा भाईंदर शहरासाठी 135 एमएलडी पाणी आरक्षित आहे. या मंजूर कोट्याप्रमाणे संपूर्ण पाणी मीरा भाईंदरला देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तांत्रिक बाबींची पूर्तता करून येत्या काही दिवसात हे वाढीव पाणी मीरा भाईंदर शहराला मिळेल, असे सांगण्यात आले. पुढच्या काही महिन्यात आणखी 20 एमएलडी पाणी मीरा भाईंदरला देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
मीरा भाईंदरमध्ये अपुऱ्या पाण्याने लोकांचे हाल होत आहेत. पाणी प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी होत होती. यासाठी काही दिवसापूर्वी आमदार प्रताप सरनाईक, गीता जैन, महापौर जोस्ना हसनाळे यांनी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची भेट तर पत्र देऊन मीरा भाईंदरच्या पाणी प्रश्नावर बैठक आयोजित करण्याची विनंती केली होती. त्यानुसार मंत्री सुभाष देसाई यांनी आज (सोमवार) मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. उद्योग विभागाच्या अंतर्गत 'एमआयडीसी'च्या मंजूर कोट्यातून मीरा भाईंदरला पाणी पुरवले जाते.