ठाणे - कोरोना महामारीमुळे या वर्षी गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रौत्सव देखील साधेपणाने साजरा करण्यात आला. गणेशोत्सव काळात मूर्ती विसर्जनासाठी प्रशासनाने व्यवस्था केली होती तशीच व्यवस्था आज देवी विसर्जनासाठी मीरा-भाईंदर महानगरपालिकेने केली आहे. महानगरपालिका क्षेत्रात १२ स्वीकृती केंद्र तयार करण्यात आली आहेत. त्याठिकाणी महानगरपालिका कर्मचारी व इतर विभागाचे अधिकारी देखील उपस्थित आहेत. चौपाटी तलावात विसर्जनासाठी बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे स्वीकृती केंद्राची निर्मिती करण्यात आली.
नवरात्रौत्सवासाठी राज्य सरकार आणि मीरा-भाईंदर मनपा प्रशासनाने नियमावली जारी केली होती. यामध्ये प्रामुख्याने आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यास बंदी, सार्वजनिक मंडपात पाच पेक्षा अधिक कार्यकर्ते बसू नये, सामाजिक अंतर पाळावे, मास्क, सॅनिटायझरचा वापर बंधनकारक केला होता. नऊ दिवसांच्या सेवेनंतर आज देवीभक्तांकडून देवीला निरोप दिला जात आहे. मात्र, यावर्षी निरोप देताना जल्लोष मिरवणूक नसल्याने देवी भक्तांमध्ये नाराजी आहे. विसर्जनासाठी मीरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.