मीरा-भाईंदर (ठाणे) -राष्ट्रीय पातळीवर करण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण-२०२० उपक्रमात मिरा-भाईंदर शहराला गौरवण्यात आले आहे. यंदा राज्य पातळीवर चौथा तसेच राष्ट्रीय पातळीवर १९ वा क्रमांक प्राप्त झाल्यामुळे आरोग्य विभागाचे कौतुक करण्यात येत आहे.
भारत सरकारच्या नगर विकास विभागामार्फत संपूर्ण देशात ४ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२० दरम्यान स्वच्छ सर्वेक्षण २०२० मोहीम राबवण्यात आली. या सर्वेक्षणात देशातील एकूण ४२४२ शहरांनी भाग घेतला होता. त्यात लाख ते दहा लाख श्रेणीमधील लोकसंख्या असलेल्या शहरांमधून मिरा भाईंदर शहराचा देशात १९ वा तर महाराष्ट्रात चौथा क्रमांक आला आहे. त्याचप्रकारे शहराला कचरामुक्त शहर म्हणून तीन तारांकित तसेच हागणदारी मुक्त कार्यामुळे 'ओडीएफ ++' म्हणून गौरवण्यात आले.