ठाणे: मला जीवे मारण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी गुंड राजा ठाकूर यांना दिली आहे, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या आरोपावर मंत्री शंभूराज देसाई यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, खासदार श्रीकांत शिंदे यांना बदनाम करण्यासाठीच संजय राऊत यांनी आरोप केले आहेत. तसेच राऊत यांनी नाहक स्वतःचे महत्व वाढवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचा टोला मंत्री शंभुराज देसाई यांनी लगावला आहे.
मंत्री शंभूराज देसाईंची टीका: पालकमंत्री शंभूराज देसाई हे बुधवारी ठाणे दौऱ्यावर होते. शिवसेना सातारा जिल्हासंपर्क प्रमुख शरद कणसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर शंभुराज देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी संजय राऊत, जितेंद्र आव्हाड आणि शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.
राऊतांचा केविलवाणा प्रयत्न: मंत्री देसाई म्हणाले की, खासदार श्रीकांत शिंदे यांना बदनाम करण्यासाठीच संजय राऊत असे वक्तव्य करत आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर लक्ष द्यायला लोकांना वेळ नाही, संजय राऊत बोलायला लागल्यानंतर त्यांना कुणीही गांभिर्याने घेत नाही. उलट लोक टीव्हीच बंद करतात, अशी खोचक टीका त्यांनी राऊतांवर केली. स्वतःचे महत्व वाढवुन सुरक्षा मिळवण्याचा त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचे देखील त्यांनी सांगितले. संजय राऊतांच्या आरोपात कोणतेही तथ्य नसुन त्यांच्या या विधानावरून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे सष्ट केले. तसेच शरद पवारांनी याआधीही अशी वक्तव्ये केल्याचे सांगत नाव न घेता टोला लगावला.