ठाणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकडे त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय सामाजिक विकास राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कल्याणात व्यक्त केले. कल्याणातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते देवचंद अंबादे यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी ते कल्याणात आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
काय म्हणाले रामदास आठवले
राज्याच्या राजकारणात शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादीने महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केलेली आहे. पण, गेली अनेक वर्षे शिवसेना-भाजप एकत्र राहिली आहे आणि अजूनही वेळ गेलेली नाही. मला असे वाटत की शिवसेना, भाजप आणि आरपीआय महायुती सरकार पुन्हा येऊ शकते. अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर पुन्हा चर्चा होऊ शकते. एकत्र बसून पुन्हा काही मार्ग काढता येतो का त्यावर चर्चा होऊ शकते. नारायण राणे व उद्धव ठाकरे यांच्यातील वाद मिटला पाहिजे, अशा पद्धतीचे वाद आपल्याला चालणार नाही. नारायण राणे यांच्यावर केलेली कारवाई योग्य नाही. दोघांकडून एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा महाराष्ट्राच्य विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.