ठाणे : जिल्ह्यातील विविध शहरात म्हाडाची घरे आहेत. मात्र, भिवंडी शहरात नसल्याने महापालिका प्रशासनाने भूखंड उपलब्ध करून दिल्यास शहरात म्हाडाच्या २० हजार घरांची उभारणी करणार असल्याची घोषणा गृहनिर्माण व म्हाडाचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. मंत्री आव्हाड हे भिवंडी पालिका आयुक्तांच्या भेटीला पालिका मुख्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी २० हजार घरांची घोषणा केली.
दुर्घटनेत बळी गेलेल्या व्यक्तीला ५ लाखांची मदत जाहीर
भिवंडी महापालिका क्षेत्रात शेकडोच्या संख्येने धोकादायक इमारतीसह अनधिकृत इमारती उभ्या आहेत. त्यामुळे दरवर्षीच पावसाळ्यात अशा इमारती कोसळून दुर्घटना घडतात. या दुर्घटनेत आतापर्यंत अनेक जणांचे जीव गेले आहेत. कालही एक मजली अनधिकृत इमारत कोसळली.त्यामध्ये १ जणांचा बळी गेला. तर ९ जण जखमी झाले. तर आव्हाड यांनी या कालच्या दुर्घटनेत बळी गेलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. तर जखमींना ५० हजार रुपयासह त्यांच्यावरील उपचार खर्च महापालिका प्रशासन करणार असल्याचेही सांगितले.
भिवंडी महानगरपालिकेच्या आझमीनगर झोपडपट्टीतील एक मजली घर कोसळली. यात एका पुरूषाचा मृत्यू झाला आहे. तर, 2 महिलासह 9 जण जखमी झाले आहेत. त्यांना भिवंडीच्या आयजीएम हाॅस्पीटलमध्ये दाखल केले.
हेही वाचा -तारापूर औद्योगिक क्षेत्रातील जखारिया कंपनीत स्फोट; एक ठार, पाच कामगार जखमी