ठाणे -एकेकाळचे खास मित्र आणि काही वर्षांपासूनचे राजकीय हाडवैरी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी खुप वर्षानंतर पुन्हा एकदा मैत्रीची तार छेडली आहे. म्हाडाच्या माध्यमातून वर्तकनगर पोलीस वसाहतीचा पुनर्विकास करण्यात येणार असून याची घोषणा करण्यासाठी आव्हाड आणि सरनाईक एकत्र आले होते.
वर्तक नगर पोलीस वसाहतीचा पुन:र्विकास तीन वर्षांतच करणार - जितेंद्र आव्हाड - ठाणे प्रतापराव सरनाईक बातमी
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने प्रत्येक जिल्ह्यातील एकमेकांचे राजकीय शत्रू आता मित्र झाल्याचे चित्र समोर आले आहे. त्याचप्रमाणे ठाण्यात राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांचे राजकीय वैर सर्वश्रूत आहे. परंतु पोलीस वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पामुळे ते एकत्र आल्याचे चित्र ठाणेकरांना कित्येक वर्षांनी पाहायला मिळाले.
वर्तक नगर पोलीस वसाहतीचे पुनर्वसन प्रक्रिया सेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने आणि गृहनिर्माण मंत्री यांच्या प्रयत्नाने पोलीस इमारती म्हाडा कडून बांधण्यात येणार आहे. तब्बल 1600 घरे बांधण्यात येणार असून यातील 567 घरे पोलिसांना देण्यात येणार आहेत. तर 10 टक्के घरे हे शासकीय कर्मचाऱ्यांना रखीव ठेवण्यात येणार तसेच 1100 घरे सोडतीच्या माध्यमातून होणार असल्याचे आव्हाड यांनी संगीतले.
यावेळी महाविकास आघाडी आणि वर्तक नगर पोलिसांच्या वसाहतीमुळे दोन जुने राजकारणी मित्र एकत्र आल्याचे दिसले. आम्ही दूर गेलो होतो हे लोकांना वाटत होते. नवरा-बायकोमध्ये देखील वाद होत असतात. त्याच्यात काय नवल म्हणत, ये दोस्ती हम नही छोडेंगे असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तर महाविकास आघाडीमध्ये किती वर्षांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आली. त्यामुळे आम्ही एकत्र होतो आणि आताही राहू, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.